राज्यभरातून भाविकांचे जत्थे चंद्रपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:43 PM2018-03-28T23:43:04+5:302018-03-28T23:43:04+5:30
चंद्रपूरचे आराध्य माता महाकालीची यात्रा २३ मार्चपासून सुरू झाली आहे. या यात्रेत आता भाविकांची गर्दी वाढत असून राज्याच्या विविध भागातून भाविकांचे जत्थे चंद्रपुरात दाखल होत आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूरचे आराध्य माता महाकालीची यात्रा २३ मार्चपासून सुरू झाली आहे. या यात्रेत आता भाविकांची गर्दी वाढत असून राज्याच्या विविध भागातून भाविकांचे जत्थे चंद्रपुरात दाखल होत आहे. महापालिका, जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाकडून भाविकांना सुविधा पुरविल्या जात असल्या तरी भाविकांची गर्दी वाढल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे रखरखत्या उन्हातही भाविकांचा उत्साह कायम असल्याने सर्वत्र भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवर्षी चैत्र पोर्णिमेला चंद्रपूरचे आराध्य दैवत ऐतिहासिक महाकाली मंदिर परिसरात यात्रा भरते. राज्याच्या विविध भागातून भाविक यानिमित्त माता महाकालीचे दर्शन घ्यायला येतात. २३ मार्चपासून यात्रा सुरू झाली. मात्र सुरुवातीच्या चार दिवस भाविकांची फारशी गर्दी नव्हती. मात्र मागील दोन दिवसांपासून मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढत आहे. ट्रक, मेटॅडोर, ट्रॅक्टर यासारख्या वाहनांनी भाविक चंद्रपुरात येत आहेत.
महापालिकेतर्फे आरोग्य सुविधा
यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोई-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून मंदिर परिसरात एक छोटेखानी दवाखाना उघडण्यात आला आहे. ज्या भाविकाची प्रकृती बिघडली, असे भाविक येथे येऊन उपचार करून घेत आहे. या ठिकाणी नि:शुल्क औषधी देण्यात येत आहे. मात्र एखाद्या भाविकाची प्रकृती अधिकच गंभीर असल्यास त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले जात आहे.
निवासाची व्यवस्था
भक्तांच्या निवासाच्या दृष्टीने मंदिराच्या आतील परिसरात दोन मोठे लोखंडी शेड तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी एक धर्मशाळेच्या समोरील विभागात तर दुसरा मंदिराच्या समोर उभारण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी भाविकांनी आपला तात्पुरता संसार थाटला आहे. अनेक भाविक येथे मुक्कामी राहत असल्याने स्वयंपाकही त्याच ठिकाणी करतात. बुधवारी प्रस्तुत प्रतिनिधीने या ठिकाणी फेरफटका मारला असता अनेक भाविक स्वयंपाक करताना दिसून आले.
पोलीस विभागातर्फे दोन चौक्या
यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व भाविकांना कुठलीही अडचण जाऊ नये, यासाठी मंदिर परिसरात पोलीस विभागाच्या वतीने दोन तात्पुरत्या चौकी उभारण्यात आल्या आहेत. सर्वत्र तगडा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. भाविकांच्या कुटुंबातील कुणी हरविल्यास पोलीस चौकीतून ध्वनीक्षेपकामार्फत याची माहिती देण्यात येते. जो हरविला असेल, त्याला चौकीत बोलाविण्यात येत व त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जाते.
तप्त उन्हात कारंज्याचा गारवा
हजारोंच्या संख्येत भाविक दर्शनासाठी येत असल्याने मंदिर परिसरात एकच गर्दी उसळते. त्यामुळे दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. सहा हजार चौरस फूटचा शेड तयार करण्यात आला आहे. याशिवाय १२ हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे. भाविकांच्या रांगेत मजबूत रेलींग, पिण्याच्या पाणी, पंख्यांची सोय केली आहे. सध्या उन्हाळ्यात दिवस असल्याने दर्शन रांगेच्या मंडपात वरच्या भागाला छोटेखानी कारंजे लावण्यात आले आहे. यातून पाण्याचे बारिक फव्वारे अंगावर उडत असल्याने भाविकांना गारवा मिळत आहे.