राज्यात तिघाडा, वॉर्डात बिघाडा; इच्छुक उमेदवारांची उडाली झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:29 AM2021-09-25T04:29:24+5:302021-09-25T04:29:24+5:30
स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्यासाठी पॅनल पद्धतीच्या निवडणुकीचा महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने बहुसदस्यीय ...
स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्यासाठी पॅनल पद्धतीच्या निवडणुकीचा महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाचा आदेश धडकल्यानंतर प्रशासनाने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले. मनपा प्रशासन आयोगाकडे अहवाल सादर करणार होते. या पद्धतीबद्दल मतदार व राजकारण्यांत उत्सुकता निर्माण झाली. शिवाय, पॅनल पद्धतीमुळे फायदा कोणाला होईल, याबाबत आडाखे मांडणे सुरू झाले. मनपात भाजप व मित्रपक्षांची सत्ता आहे. सरकारने अचानक पवित्रा बदलवून पुन्हा बहुसदस्यीय पद्धतीनेच निवडणूक घेण्याचे जाहीर केले आहे.
बॉक्स
अशी राहील बहुसदस्यीय पद्धत..
निवडणुकीत एकसदस्यीय पद्धतीमुळे एका प्रभागातील उमेदवार सहज निवडून येतात. अपक्षांची संख्या वाढून घोडेबाजाराला ऊत येऊ शकतो. दमदार नगरसेवकांचा प्रभाव मोडीत काढून पक्षांचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी बहुसदस्यीय पद्धत आणल्याची विरोधकांत चर्चा आहे. या पद्धतीमुळे एकाच प्रभागात प्रभाव सिद्ध न करता जवळच्या चार प्रभागात ताकद सिद्ध करावी लागते.
बॉक्स
एका मतदाराला तिघांना द्यावे लागणार मत
एकसदस्यीय प्रभागरचनेतील एका लहान प्रभागातील जनसंपर्काशिवाय त्या सदस्याला तीन- चार बहुसदस्यीय प्रभागात कर्तृत्व सिद्ध करावे लागते. एकमेकांवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय राहत नाही. एका मतदाराला तिघांना मत द्यावे लागणार आहे.
बॉक्स
पालिकेतील सध्याची स्थिती
मनपामध्ये सध्या १७ प्रभागातून ६६ नगरसेवक प्रतिनिधित्व करतात. भाजप व मित्रपक्ष मिळून ३८ नगरसेवकांची सत्ता आहे. बहुसदस्यीय पद्धतीत कोण बाजी मारणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
नगरसेवक म्हणतात...
राजकीय पक्षाच्या धोरणांशी प्रामाणिक राहून जनतेची कामे करणाऱ्यांना काही फरक पडत नाही. एका प्रभागातून सदस्य किती राहतात हा मुद्दा गौण आहे. पक्षानेही काम करणाऱ्यांनाच प्राधान्य द्यावे.
-नंदू नागरकर, नगरसेवक व माजी शहराध्यक्ष काँग्रेस, चंद्रपूर
कोट
एकसदस्यीय पद्धतीमुळे वॉर्डाचा विकास होतो. संबंधित नगरसेवकाची जबाबदारी निश्चित होते. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देतो. लोकसभा व विधानसभा क्षेत्रात एकच प्रतिनिधी असतो. मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये का नाही.
-सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेवक, चंद्रपूर