कोरपना : तालुक्यातील वनसडी येथे वन वसाहतीलगत निजामकालीन इन्स्पेक्शन बंगला (शासकीय विश्रामगृह) आहे. या ऐतिहासिक वास्तूकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ही वास्तू वन विभागाला हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
१९३५ला निजाम राजवटीत हा बंगला बांधण्यात आला. त्यावेळी निजामांचा परिसरातील राज्य कारभार येथूनच चालायचा. राजुरा उपविभागाचे चंद्रपूर जिल्ह्यात हस्तांतरण झाल्यानंतर हा बंगला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली आला. या ठिकाणी विश्रामगृह थाटण्यात आले. परंतु काही दिवसांनंतर बंद करण्यात आले. तेव्हापासून हा बंगला दुर्लक्षित पडला आहे. परिणामी ही वास्तू दुरवस्थेकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे ही वास्तू लगतच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला हस्तांतरित करण्यात यावी. ही वास्तू हस्तांतरित झाल्यास त्या कार्यालयाच्या उपयोगी येऊ शकते. शिवाय हा परिसरही योग्य देखरेखीत राहील. त्या अनुषंगाने संबंधित विभागाने ही वास्तू वन विभागाला हस्तांतरित करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ही वास्तू हस्तांतरित झाल्यास हा ऐतिहासिक वारसाही जपला जाईल.