चंद्रपूर : पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटतर्फे मुंबई येथील बीकेसी जीओ सेंटरमध्ये १५ ते १७ जून २०२३ रोजी भारतातील सर्व विधानसभा व विधान परिषदेचे अध्यक्ष व सभापती यांच्या सहकार्याने ‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत’ आयोजित करण्यात आले. नेतृत्व, लोकशाही, प्रशासन व शांतताप्रिय समाज निमिर्तीसाठी प्रथमच देशातील दोन हजारपेक्षा अधिक आमदार राष्ट्रीय विधायक संमेलनात एकत्रित येऊन विचारमंथन करणार आहेत, अशी माहिती चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी शनिवारी शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संमेलन संयोजन समितीचे सदस्य योगेश पाटील, प्रकाश महाले, संजय गजपुरे व होमराज गजपुरे उपस्थित होते. राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय सर्वांगीण शाश्वत विकास या मध्यवर्ती विचार त्रिसुत्रीचा प्रमुख उद्देश ठेऊन हे संमेलन आयोजित केल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. संमेलनाचा उद्घाटन सोहळा १६ जून रोजी होणार आहे. १७ जून रोजी या संमेलनाचा समारोप होईल. या व्यतिरिक्त ४० समांतर सत्र आणि गोलमेज परिषद होणार आहेत.
लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, शिवराज पाटील चाकुरकर, मनोहर जोशी, लोकसभा सभापती ओम बिर्ला हे या संमेलनाचे मार्गदर्शक व संयोजक आहेत. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या विचार चिंतनामधून ‘राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत’ ही संकल्पना साकारली आहे. ते या संमेलनाचे प्रमुख संयोजक समन्वयक आहेत. संमेलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
असे आहेत संमेलनातील विषय
संमेलनात सार्वजनिक जीवनातील तणाव व्यवस्थापन, शाश्वत विकासाची साधने आणि प्रभाव, कल्याणकारी योजना. शेवटच्या व्यक्तीचे उत्थान, आर्थिक कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कौतुकास्पद विधानपद्धती, आपला मतदारसंघ विकसित करण्याची कला आणि कौशल्य, आपली प्रतिमा तयार करणे, साधने आणि तंत्रे, विधिमंडळ कार्यप्रदर्शन, अपेक्षेनुसार जगणे आणि सामाजिक कल्याणासाठी सहयोग, नोकरशहा आणि आमदार या विषयांवर चर्चा होणार आहे.