चंद्रपूर : अर्जुनी गावालगत भानुसखिंडी संरक्षित वनात रेतीची अवैध तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर वनविभागाने जप्त केले. याप्रकरणी अभय गोवर्धन खिरटकर, चेतन रमेश खिरटकर, विशाल प्रकाश कोडापे, हनुमान पुंजाराम वासे, दिनेश देवराव भोस्कर, सर्व रा. कोकेवाडा, विठ्ठल देवराव खाडे धानोली, दीपक पांडुरंग चवले चारगाव, नरेश हरिदास मडावी यांच्यावर भारतीय अधिनियम १९२७ नुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताडोबा अंधारी क्षेत्रातील अर्जुनी गावालगतच्या भानुसखिंडी संरक्षित वनात रेतीची अवैध तस्करी होत असल्याची माहिती ताडोबाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर वनविभागाच्या पथकाने छापा टाकून दोन ट्रॅक्टर-ट्राॅलीसह १४ लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी वरील सहाजणांवर भारतीय अधिनियम १९२७ नुसार कलम २६ (१)ड, २६(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे, क्षेत्र सहायक एस. एम. नन्नावरे, वनरक्षक पी. आर. कोसुरकर, आदींनी केली. पुढील तपास सहायक वनसंरक्षक खोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
रेती तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:24 AM