वनकर्मचाऱ्यांनी बांधला वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:30 AM2020-12-06T04:30:18+5:302020-12-06T04:30:18+5:30
चिमूर : पावसाळ्यात कमी झालेल्या पावसामुळे उन्हाळ्याअगोदरच नदीनाले तलाव कोरडे पडले. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधत गावशेजारी येतात. त्यामुळे वन्यजीव ...
चिमूर : पावसाळ्यात कमी झालेल्या पावसामुळे उन्हाळ्याअगोदरच नदीनाले तलाव कोरडे पडले. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधत गावशेजारी येतात. त्यामुळे वन्यजीव व मानव संघर्ष होतो. हा संघर्ष टाळावा यासाठी चिमूर वन परिक्षेत्रातंर्गत पिटीचुवा नाल्यावर वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वनराई बंधारा बांधून वन्यप्राण्यांची उन्हाळ्यातील पाण्याची तजवीज केली आहे.
चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणारे अनेक हेक्टर जंगल गावाशेजारी आहे. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, हरीण असे अनेक वन्यजीव वास्तव करतात. या जीवांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यामुळे या जीवाना जंगलातच पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून वनविभाग अनेक उपक्रम राबवीत आहे. चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गदगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ३७२ मध्ये पिटीचुवा नाल्यावर शेकडो सिमेंट बॅगच्या सहाय्याने वनराई बंधारा बांधून पाणी अडवले आहे. हा बंधारा बांधताना सहाय्यक वनसंरक्षक आर. एम. वाकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवांडे, वनकर्मचारी आदी उपस्थित होते.