झाडांमुळे उड्डाणपुलाला धोका
चंद्रपूर : वरोरा नाका परिसरात असलेल्या उड्डाणपुलावर झाडे उगवल्यामुळे या पुलाला धोका निर्माण झाला आहे. संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. पुलावरील झाडे तोडण्याची मागणी करण्यात आली आहे. मागील वर्षभरापासून येथे झाडे असूनही याकडे संबंधित विभागाचे लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्वच्छतेअभावी नागरिक हैराण
चंद्रपूर : शहरातील काही वॉर्डात घाणीचे साम्राज्य आहे. बिनबा वॉर्ड, बंगाली कॅम्प, बाबूपेठ, तसेच पठाणपुरा गेटसमोरील परिसरात सर्वत्र कचरा साचला आहे. घाणीमुळे रोगराई पसरली असून, डासांचे प्रमाण वाढले आहे. मनपाने येथे स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.
आझाद बाग सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : येथील आझाद बाग मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे येथे नियमित येणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथील दुरुस्तीचे काम पूर्ण करून आझाद बागसुद्धा खुला करावा, अशी मागणी केली जात आहे.
महात्मा फुले पुतळ्याचे सौंदर्यीकरण करावे
चंद्रपूर : भिवापूर वॉर्ड हनुमान खिडकीजवळ महात्मा फुले यांचा पुतळा आहे. या पुतळ्याची दुरवस्था झाली असून, याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे चंद्रपूर शहर मनपा प्रशासनाने या पुतळ्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देऊन सौंदर्यीकरण करण्याची मागणी होत आहे.
गतिरोधक तयार करण्याची मागणी
टेमुर्डा : येथील रस्त्यांवर अपघाताची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी तातडीने गतिरोधक तयार करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. येथे परिसरातील मोठी बाजारपेठ असल्याने रस्त्यांवर नेहमी नागरिकांची वर्दळ असते. सध्या वाहनांची संख्याही वाढली आहे.
सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी
जिवती : तालुक्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध न झाल्याने तालुका अजूनही मागासलेला आहे. हा तालुका पूर्णत: शेतीवर अवलंबून असल्याने सिंचनाशिवाय विकास अशक्य आहे. तालुक्यात कोणत्याही प्रकारचे उद्योगधंदे नसल्याने बहुतांश जनता शेतीवरच आपला संसार चालवित आहे.
व्यावसायिकांद्वारे ग्राहकांची लूट
चंद्रपूर : ग्राहकांना वस्तू मोजून देणे व वजनानुसार बरोबर पैसे घेणे, ही व्यवहाराची पद्धत आहे. पण पैसे बरोबर देऊनही वजनात तूट निर्माण होण्याच्या प्रकारामुळे ग्राहक लुटले जात आहेत. लहान-मोठ्या विक्रेत्यांकडून सर्रासपणे अशी लूट सुरू आहे. यावर आळा घालण्यासाठी संबंधितांनी ग्रामीण, तसेच शहरी भागात विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.
अंगणवाडी केंद्रांमध्ये सुविधांचा अभाव
ब्रह्मपुरी : तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रांची दुरवस्था झाली असून, बालकांच्या पूर्वशालेय शिक्षणाची उपेक्षा होत आहे. तालुक्यात अनेक गावांमध्ये अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आली; मात्र सोईसुविधा नसल्याने बालकांची गैरसोय होत आहे. गरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, या हेतूने सुरू केलेल्या अंगणवाडी केंद्रांकडे दुर्लक्ष होत आहे.
व्यवसायासाठी कर्ज द्यावे
नागभीड : महिला बचतगटांची संंख्या वाढली असली तरी स्वयंरोजगार उभे करण्यासाठी अपयश येत आहे. बँकांकडून कर्ज उपलब्ध होत नसल्याने, महिला बचतगट अत्यंत छोट्या व्यवसायात अडकले आहेत. यातून पुरेसा आर्थिक मोबदला मिळत नाही. त्यामुळे महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी बचतगटांना कर्ज देण्यात यावे, अशी मागणी बचतगटातील महिलांकडून करण्यात येत आहे.
धान उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत
सावली : यंदा अल्प उत्पादन झाल्याने तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. हंगामासाठी पैशाची जुळवाजुळव करून पेरणी केली. मात्र, उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाल्यामुळे यावर्षीही स्वप्न भंगले आहे.
नियमबाह्य वाहतूक ठरतेय धोक्याची
वरोरा : गावात नियमबाह्य व विनापरवाना अल्पवयीन चालक अशा प्रकारच्या वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अपघाताची शक्यता बळावली असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
अनावश्यक सेवांनी मोबाइलधारक त्रस्त
चंद्रपूर : मोबाइलचा वापर सर्वत्र वाढला आहे; पण कंपन्यांकडून अनावश्यक सेवांचा भडिमार होत असल्याने मोबाइलधारक त्रस्त झाले आहेत. याची तक्रार संबंधित ग्राहक तक्रार केंद्राकडे केली जाते; पण त्याचा निपटारा होत नसल्याचे दिसते. त्यामुळे ग्राहकवर्ग त्रस्त झाला आहे.
व्यवसायासाठी आर्थिक मदतीची गरज
जिवती : तालुक्याला रोजगार पुरवू शकणारा एकही मोठा उद्योग नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून असणाऱ्या शेतकरी कुटुंबातील युवकांच्या हाताला काम नाही.
एटीएममध्ये नोटांचा तुटवडा
गोडपिपरी : शहरातील मुख्य मार्गावर एटीएम मशीन बसविण्यात आल्या आहेत. मात्र, अनेकवेळा त्यात पैशांचा ठणठणाट दिसून येत आहे. तर कधी तांत्रिक अडचणीमुळे या एटीएम मशीन बंद असतात. त्यामुळे नागरिकांना रांगेत लागून पैसे काढावे लागत आहेत.
प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता
जिवती : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक सुरू आहे. आंध्र प्रदेशाच्या सीमेवर तालुका असल्याने येथे आंध्र प्रदेशातील अनेक वाहने अवैध प्रवासी वाहतूक करीत आहेत. जिवती ते अदिलाबाद या मार्गावर महामंडळाच्या बसेस नसल्याने अवैध वाहतूकदारांचे फावत आहे.
दूरसंचार सेवा ग्राहकांसाठी डोकेदुखी
नागभीड : येथील दूरसंचार विभागाची सेवा अनियमित असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नेरी येथे एक राष्ट्रीयीकृत बँक, सीडीसीसी बँक शाखा आहेत. त्यांना नेटवर्कअभावी फटका बसत आहे.
कुंभार समाजासाठी मंडळ स्थापन करावे
वरोरा : कुंभार समाजासाठी संत गोरोबा काका माती कला बोर्डाची स्थापना करावी, कुंभार समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करावा, मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी संपूर्ण माफ करावी, वाहतूक व वीटभट्टी परवान्यातील जाचक अट रद्द करावी, कुंभार समाजाला ओळखपत्रावर परवाना व जळावू लाकूड देण्याची मागणी समाजाकडून होत आहे.
शासकीय कार्यालये कोरपना येथे आणावी
कोरपना : तालुका वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शाखा अभियंता पकडीगुडम सिंचन प्रकल्प, हिवताप निर्मूलन आरोग्य उपपथक कार्यालये गडचांदूर व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नांदा फाटा येथे आहे. सदर कार्यालय एकाच ठिकाणी कामे होण्यासाठी कोरपना मुख्यालय असणे आवश्यक आहे. त्यामुळे या कार्यालयाचे कोरपना येथे स्थानांतर करण्याची मागणी केली जात आहे.
दत्तक घेऊन गावांचा विकास साधावा
चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी उद्योग आहेत, मात्र उद्योग परिसरातील गावांचा आजही विकास झालेला नाही. त्यामुळे उद्योगांनी गावांना दत्तक घेऊन गावांचा विकास साधावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. चंद्रपूर, कोरपना, राजुरा, भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आहे, तर मूल, सावली, पोंभुर्णा, ब्रह्मपुरी, नागभीड या तालुक्यांत उद्योग नसल्याने येथे बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
कोरपना : चंद्रपूर-कोरपना-आदिलाबाद आंतरराज्यीय व वणी मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील सोनुर्ली ते देवघाट, कोठोडा व वणी मार्गावरील कोरपना ते कोडशी(खुर्द) दरम्यान जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गाने वाहतूक करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
तुकूम परिसरातील नागरिक त्रस्त
चंद्रपूर : शहरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीने जात असताना हे मोकाट कुत्रे अचानक गाडीवर झेप घेतात. यामुळे अपघातही वाढले आहेत. तुकूम परिसरात मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणात फिरत असल्याने संताप व्यक्त केला जात असून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
सावलीत नियमित पाणीपुरवठा करावा
सावली : येथील प्रादेशिक योजनेद्वारे करण्यात येणार पाणीपुरवठा अनियमित आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मोर्चा काढूनही ही समस्या सुटली नाही. रस्त्याच्या बांधकामामुळे पाइपलाइन फुटली, असे सांगून वेळ मारून नेण्यात येते. मात्र याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
रिक्त पदामुळे नागरिकांना त्रास
चंद्रपूर : शासकीय कार्यालयांत विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, नुकतीच पंचायतराज समिती चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडे रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे. महत्त्वाची पदे रिक्त आहेत. काही रिक्त पदे अनुकंपा तत्त्वातील आहेत. वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
रस्त्यांवरील बांधकाम साहित्य हटवावे
चंद्रपूर : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामांवर लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकले जाते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. दुचाकी वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिकेने सर्व वॉर्डांची तपासणी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.
स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा
चंद्रपूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकरभरती बंद असल्यासारखीच स्थिती आहे. युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे.
वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणा
चंद्रपूर : येथील लालपेठ, पडोली, बंगाली कॅम्प परिसरातून बांधकाम साहित्याची वाहतूक करणारे अनेक ट्रक ये-जा करतात. मात्र धोकादायक व वर्दळीच्या वळणांवरही चालक वाहनाचा वेग कमी करीत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. ट्रकचालकांच्या मनमानी वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़
महामार्गावरील पुलावर जीवघेणे खड्डे
कोरपना : आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या नाल्याच्या पुलावर खड्डे पडल्याने वाहतूकदारांना तारेवरची कसरत करीत वाहन चालावावे लागते. यामुळे अनेकदा अपघातही घडले आहेत. हे जीवघेणे खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.
रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी
कोरपना : नांदा गावालगत उद्योग असल्याने येथे मागील काही वर्षांमध्ये मोठ्या संख्येने लोकसंख्या वाढली आहे. त्या तुलनेत बसस्थानकाच्या परिसरात रस्ते अरुंद असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करून परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
घुग्घुस परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
घुग्घुस : परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना त्रास होत आहे. औद्योगिक शहर म्हणून घुग्घुसची ओळख आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने वाहनधारक येतात, मात्र खड्ड्यांमुळे ते हैराण आहेत. बांधकाम विभागाने ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बंद पथदिव्यांमुळे नागरिकांना त्रास
चंद्रपूर : नागपूर, चंद्रपूर रोड तसेच बल्लारपूर मार्गावरील काही पथदिवे बंद आहे. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. पथदिवे दुरुस्त करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
घरकुल प्रकरणाचा निपटारा करावा
जिवती : तालुक्यातील रमाई आवास योजना व शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी आवश्यक कापदपत्रे सादर करूनही प्रकरणे प्रलंबित आहेत, तर काही प्रकरणे मंजूर झाली असून बांधकामे अर्धवट आहेत.
नव्या कनिष्ठ महाविद्यालयाची मागणी
कोरपना : तालुक्यातील कवठाळा व पार्डी येथे कनिष्ठ महाविद्यालय नसल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत आहे. या विद्यार्थ्यांना गडचांदूर किंवा कोरपना येथे जाऊन पुढील शिक्षण पूर्ण करावे लागते. त्यामुळे परिसरात कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अतिक्रमण हटाव
मोहीम थंड बस्त्यात
चंद्रपूर : तुकूम-दुर्गापूर मुख्य रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. दोन वर्षांपूर्वी मनपाने अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र अनेकांचे अतिक्रमण जैसे-थे आहे.
फुटपाथ विक्रेत्यांना ओळखपत्र हवे
चंद्रपूर : शहरातील फुटपाथवर व अनेक ठिकाणी लघुव्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. व्यावसायिकांकडून मनपा कर वसूल करीत आहे. काही महिन्यांपूर्वी मोहीम राबवून ओळखपत्र दिले जात होते. पण, अचानक बंद करण्यात आले. त्यामुळे शासनाकडून विविध योजनांचा लाभ मिळणे कठीण झाले. शहरातील व्यावसायिकांना ओळखपत्र देण्याची मागणी केली जात आहे.