पेल्लोरा येथे गावकऱ्यांची पाण्यासाठी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:29 AM2021-03-27T04:29:36+5:302021-03-27T04:29:36+5:30
गोवरी : राजुरा तालुक्यातील पेल्लोरा गावात मार्च महिन्यातच पाणीटंचाई निर्माण झाली असून गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली ...
गोवरी : राजुरा तालुक्यातील पेल्लोरा गावात मार्च महिन्यातच पाणीटंचाई निर्माण झाली असून गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
राजुरा तालुका स्थळापासून २५ किमी. अंतरावर असलेल्या पेल्लोरा येथे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जेमतेम १ हजार ३७० लोकसंख्या असलेल्या गावात पाण्यासाठी सरकारी हातपंप असेल तरी काही हातपंप आटले तर काही हातपंप अखेरच्या घटका मोजत आहे. दरवर्षी पेल्लोरा गावात पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यावर्षीही गावकऱ्यांच्या वाट्याला पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे.
येथील सरपंच कल्पना झाडे, उपसरपंच मंगेश भोयर यांनी प्रशासनाकडे पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा केला. गावकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत येथील नागरिक विनोद झाडे, रुपेश दुबे यांच्या शेतातील बोअरवेलमधून बाबाकर राजूरकर यांच्या ट्रॅक्टरवर टँकरने व काही सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या नागरिकांकडून पाणी देऊन तात्पुरती सोय करून दिली. पेल्लोरा परिसरात उन्हाळ्यापूर्वीच पाण्याची पातळी खालावत असल्याने अनेक घरगुती बोअरवेलला पाणी येत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
पेल्लोरा गावात मागील काही दिवसांपासून पाण्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. गावात पूर्वीपासून पाण्यासंबंधी तुटवडा आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. पाण्यासाठी जीव कासावीस होत असताना गावात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त आहे. याकडे प्रशासनाने गावकऱ्यांची पाणी समस्या लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.
बाॅक्स
परिसरात पाण्याचे जलस्त्रोत आटले
पेल्लोरा,चार्ली, निर्ली, धिडसी, मारडा नदीपट्यात दरवर्षी पाण्याची स्थिती अतिशय बिकट असते. यावर्षी मार्च महिन्यातच पाण्याची समस्या जाणवू लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन गावकऱ्यांची पाण्याची समस्या दूर करावी.