जिल्ह्यात जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:31 AM2019-08-17T00:31:20+5:302019-08-17T00:31:53+5:30
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न बघितले असून त्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले आहे. जलसाक्षरता अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून जिल्हा पाणीदार करण्यासाठी जलसत्याग्रह चळवळ उभी करण्यात येणार असून याकरिता सर्वांनी सहकार्य करावे,
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न बघितले असून त्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले आहे. जलसाक्षरता अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून जिल्हा पाणीदार करण्यासाठी जलसत्याग्रह चळवळ उभी करण्यात येणार असून याकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
७३ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे शानदार आयोजन जिल्ह्याधिकारी कार्यालयात करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला खासदार बाळू धानोरकर, आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्य संग्राम सैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या विकासाकरिता विविध सिंचन योजना पूर्णत्वास आल्या असून यामध्ये चीचडोह प्रकल्पामुळे चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्याला फायदा होणार आहे. सोबतच कोटगल, पळसगाव-आमडी, चिंचाळा प्रकल्पही पूर्णत्वास आले आहे. मोठ्या प्रमाणावर बंधाºयाचे काम या जिल्ह्यात सुरू झाले आहेत. प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी पोहचून आपला जिल्हा येत्या पाच वर्षात पाणीदार व्हावा, याकरिता संकल्प केला असून ४ आॅगस्ट रोजी जलपुरुष राजेंद्र सिंह व सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांच्या उपस्थितीत जलसाक्षरता अभियानाला गती देण्यासाठी संकल्प केला आहे. जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतीच्या सहभागाने जलसत्याग्रह चळवळ सुरू करण्यात येणार आहे. याकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राज्यातील निराधार, विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता महिलांचे अनुदान सहाशे रुपयावरून एक हजार रुपये व दोन मुले असल्यास बाराशे रुपयेपर्यंत वाढवले आहे. अण्णाभाऊ साठे यांचे हे शंभरावे जयंती वर्ष असून त्यांच्या नावाने भारतीय डाक विभागाशी प्रयत्नपूर्वक संपर्क करून डाक तिकीट सुरू केले आहे. शासनाने सोलर चरख्याकरिता आठ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद केली आहे, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.
कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सत्कार
या सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी बजावणाºया अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा नियोजन विभागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुजीब शेख, अशोक राऊत, ज्ञानू लवटे, अजय राठोड तसेच शंभर टक्केपेक्षा जास्त महसूल गोळा केल्याबद्दल अनुप हंडा, भारवी जिवने, आशिष राठोड, रमेश गुज्जनवार, पौर्णिमा उईके, गजानन भुरसे, भगवान रणदिवे, अरविंद डाहुले, सूर्यकांत ढाकणे, प्रफुल्ल चिडे, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभागामार्फत सीमा मामीडवार, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत उथळपेठ, आठवीमध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये नववे स्थान संपादन केल्याबाबत वेदांत येरेकर, आरोग्य विभागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. सूर्यकांत बाबर, डॉ. जिनी पटेल, डॉ. उल्हास सरोदे, संवर्ग विकास अधिकारी बागडी, डॉ. संदीप गेडाम, डॉ. सुधीर मेश्राम, छाया पाटील, केंद्र शासनाचे गृह विभागाकडून उत्तम जीवन रक्षा पदक प्राप्त डॉ. चरणजीतसिंग सलुजा, पोलीस विभागामार्फत शेखर देशमुख, हृदयनारायण यादव, प्रकाश कोकाटे, स्वप्निल धुळे, दीपक गोतमारे, किसन शेळके, विठ्ठल मुत्यमवार, धर्मेंद्र जोशी, ए. एम. सय्यद, महेश कोंडावार, महेंद्र आंभोरे, प्रशांत केदार, विकास मुंडे, नीलेश वाघमारे, संदीप कापडे, संदीप मिश्रा, दिलीप लोखंडे, आकाशकुमार साखरे, तीर्थराज निंबेकर, सुधीर बंडावार, कुणाल रामटेके यांना विशेष सेवा पदक तर भीमा वाकडे, रमेश पढाल, एस. खैरकर यांना महासंचालक यांचे विशेष सन्मान चिन्ह पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट कार्यालयीन कामाकरिता विवेक कोहळे तसेच आपत्ती निवारणाकरिता शोध व बचाव पथकाचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये सुनील नागतोडे, शरद बनकर, गजानन पांडे, अजय यादव, राहुल पाटील, विपिन निंबाळकर, मयूर चहारे, मोरेश्वर भरडकर, निळकंठ चौधरी, राष्ट्रपाल नाईक, पुंडलिक ताकसांडे, टी.डी. मेश्राम, इन्द्रपाल बैस, के. एम. वलेकर, व्ही. एन. ढुमणे यांचा समावेश आहे.
आठ दिवसात जिल्हा गॅसयुक्त
जिल्ह्याचा विचार केल्यास येथील जनतेने जिल्हा पुढे जावा याकरिता भरपूर प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्र सरकारने अनेक योजना राबवलेल्या असून बीपीएलमध्ये नाव नसेल तरीही दोन रुपये, तीन रुपये किलो अन्नधान्याचे वाटप करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. तसेच संपूर्ण राज्य चूलमुक्त व धूरमुक्त करून गॅसयुक्त करण्याकरिता अभियान राबवलेले आहे. जनसामान्यांना गॅस कनेक्शन देण्यात राज्यात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर असून यावेळी घोषित करू इच्छितो की येत्या आठ दिवसात चंद्रपूर जिल्हा गॅस युक्त झालेला राज्यातील पहिला जिल्हा असेल, अशी माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
चांदा- कृषी मोबाईल अॅप
ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर कृषी अॅपचे उदघाटन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व आत्मा कार्यालय यांच्या वतीने चांदा कृषी मोबाईल अॅप सुरू करण्यात आले. या अॅपच्यामार्फत जिल्ह्यातील विविध कृषी योजना तसेच लाभार्थ्यांची माहिती, कृषी विषयक सल्ला, शेतकºयांनी साकारलेले प्रयोग, त्यांच्या यशकथा याबाबतची माहिती या अॅपमार्फत दिली जाणार आहे.