पाणीपुरवठा योजनांना गती मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 10:51 PM2019-02-27T22:51:47+5:302019-02-27T22:52:09+5:30

गावातील पाणी पुरवठा योजनांचे व्यवस्थापन करणाऱ्या ग्राम पाणी पुरवठा समित्या मागील वर्षी ९ मार्च २०१८ रोजी बरखास्त करण्यात आल्या. आता नळयोजनांना गती मिळणार असल्याची माहिती आहे.

Water supply schemes will get accelerated | पाणीपुरवठा योजनांना गती मिळणार

पाणीपुरवठा योजनांना गती मिळणार

Next
ठळक मुद्देसमित्या बरखास्त : योजनांचा कारभार नियोजन समितीकडे

घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : गावातील पाणी पुरवठा योजनांचे व्यवस्थापन करणाऱ्या ग्राम पाणी पुरवठा समित्या मागील वर्षी ९ मार्च २०१८ रोजी बरखास्त करण्यात आल्या. आता नळयोजनांना गती मिळणार असल्याची माहिती आहे.
मागील दहा बारा वर्षांपासून नागभीड तालुक्यात पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू असले, तरी फार थोड्या योजना पूर्ण झाल्या आहेत. बाकी बहुतेक योजना विविध कारणांमुळे अपूर्ण असून यात शासनाचा करोडो रूपयांचा निधी पाण्यात गेला आहे. सर्वांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. यात जलस्वराज्य, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना अशा विविध योजनांचा यात समावेश आहे. यातील प्रत्येक योजनेसाठी शासनाने लाखो रूपयांचा निधी दिला असला तरी प्रशासनातील लालफितशाही व स्थानिक पाणी व्यवस्थापन समित्यांच्या अज्ञानामुळे तर काही ठिकाणी भ्रष्ट प्रवृत्तीमुळे या योजनांचा बट्ट्याबोळ झाला होता.
सन २०१३ -१४ यावर्षी मान्यता मिळालेल्या अनेक योजना आहेत. ईरव्हा (टेकरी), चिंधीचक, खडकी (हुमा), मिंथूर, कोटगाव, पारडी (ठवरे), या गावांचा समावेश आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात कोदेपार, उश्राळ मेंढा, या ठिकाणी नळ योजनांना मंजुरी मिळाली. या योजनाही अपूर्णच आहेत. याची कारणे वेगवेगळी आहेत. या योजनांचे विहिर, उर्ध्व नलिका, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था ही कामे महत्त्वपूर्ण आहे. काही ठिकाणी हे कामे अपूर्ण तर काही ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे.
किती निधी, खर्च किती
शासनाकडून योजनेसाठी मंजूर रक्कमेपेक्षा बहुतेक निधी अखर्चित आहे. ईरव्हाला १९.१० लाख रुपये मंजूर असून १०.४९ लाख रुपये खर्च, चिंधीचक योजनेस ४२.४२ लाखांपैकी २०.४३ लाख खर्च, खडकी योजनेची किंमत ३६.८० लाख त्यापैकी १९.३३ लाख खर्च, मिंथुर योजना ४८.४९ लाख पैकी १९ लाख खर्च, कोटगाव योजना ४५ लाख रूपयांची असून २८.५३ लाख रूपये खर्च, पारडी (ठवरे) योजना ४८ लाखांपैकी ३०.०९ लाख खर्च, कोथुळणा योजना ३८.८८ लाखापैकी, २८.९६ लाख रुपये खर्च, उश्राळ मेंढा योजनेला २४ लाख रुपये खर्च झाले आहेत.
काही योजना निविदा प्रक्रियेत
ग्राम पातळीवर पाणी पुरवठा योजनांचे व्यवस्थापन करणाऱ्या समित्या मागील वर्षी ९ मार्च २०१८ रोजी बरखास्त करण्यात आल्या आहेत. या समित्या बरखास्त करण्यात आल्यानंतर कामाचे पूर्ण नियोजन विभागाकडे आल्याने या योजनांच्या कामास काहीशी गती आली आहे. मागील वर्षभरात मोहाळी, कोथुळणा, मिंडाळा, सोनुली, वैजापूर, पाहार्णी या नळयोजनांचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. मात्र मिंडाळा येथे नळ कनेक्शन घेण्यास नागरिकांचा विलंब होत आहे. तर अनेक योजना निविदा प्रक्रियेत असल्याचीही माहितीही या अधिकाºयाने दिली.

Web Title: Water supply schemes will get accelerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.