समाजसेवकाचा मुखवटा घालून बेकायदेशीर सावकारीला ऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:30 AM2021-09-21T04:30:36+5:302021-09-21T04:30:36+5:30
सिंदेवाही : सिंदेवाहीत अलीकडे समाजसेवकाचा मुखवटा घालून सावकारीला ऊत आला आहे. गळ्यात सोन्याचा गोफ. हातात कडे. आलिशान गाडीतून ...
सिंदेवाही : सिंदेवाहीत अलीकडे समाजसेवकाचा मुखवटा घालून सावकारीला ऊत आला आहे. गळ्यात सोन्याचा गोफ. हातात कडे. आलिशान गाडीतून सोबतीला चार ते पाच सेवक घेऊन शहरातच नव्हे तर तालुक्यात समाजसेवक म्हणून वावरायचे. हा खर्च या मंडळींना कसा परवडतो, हा सामान्यांना पडलेला प्रश्न. मात्र, वास्तव काही वेगळेच आहे.
किरकोळ कारणावरून हाणामाऱ्या करायच्या. राजकारण्यांसमोर पुढे पुढे करायचे. त्याचाच आधार घेत बेकायदेशीर सावकारीला तालुक्यात ऊत आला आहे. दहा ते वीस टक्के व्याजावर हे सावकार कर्ज देतात. तारीख उलटली की वसुलीसाठी कर्जदाराच्या दारात हजर असतात. तालुक्यात सावकारी कर्ज वितरणाचा परवाना फक्त आठ ते नऊ लोकांना आहे. पण, हे बेकायदेशीर सावकारांचे पीक आता वाढले आहे. शासकीय परवाना न घेता गैरमार्गाने सावकारी धंदा जोरात सुरू आहे. भीतीपोटी यांच्याविरोधात कोणीही तक्रारीसाठी धजावत नाही. यामुळे या मंडळींचे चांगलेच फावत आहे. तक्रारी द्या, असे पोलिसांकडून सांगितले जाते.