वेकोलिचा सिव्हील विभाग ठेकेदारावर मेहरबान
By admin | Published: July 30, 2016 01:37 AM2016-07-30T01:37:30+5:302016-07-30T01:37:30+5:30
वेकोलि वणी क्षेत्राच्या विविध कोळसा खाण क्षेत्रातील मान्सूनच्या कामाचे अवार्ड व वर्कआर्डरनंतर पीएसडी
चौकशी व्हावी : पीएसडी, आयएसडी जमा न करताच कामे पूर्णत्वाकडे
घुग्घुस: वेकोलि वणी क्षेत्राच्या विविध कोळसा खाण क्षेत्रातील मान्सूनच्या कामाचे अवार्ड व वर्कआर्डरनंतर पीएसडी आणि आयएसडी (सिक्युरीटी डिपाझिट) रक्कम ठेकेदाराकडून जमा न करता काम पूर्ण करण्याचा प्रकार सर्व कोळसा खाणीच्या सिव्हील विभागाकडून सुरु आहे. यातून वेकोलिचा सिव्हील विभाग ठेकेदारांवर मेहरबान असल्याचे दिसून येत आहे.
वेकोलि वणी क्षेत्रातील सिव्हील विभागाकडून मागील अनेक दिवसांपासून बराच गोंधळ सुरु आहे. पैनगंगा कोळसा खाणीत घडलेला प्रकार वृत्तपत्रातून समोर आल्याने बरेच गैरप्रकार आता चर्चेत येत आहे. त्या श्रृंखलेतून ठेकेदाराला त्या विभागाकडून अभय दिले जात आहे.
वणी क्षेत्रात घुग्घुस, नायगाव, निलजई, मुंगोली, वैनगंगा, कोलगाव कोळसा खाणी आहेत. या क्षेत्रात मान्सूनची कामे दोन महिन्यांपूर्वी कामाचे अवार्ड झाले. वर्कआर्डर निघाले. ज्या ठेकेदारांना अवार्ड मिळाले, त्यांनी कामाची सुरुवात केली. ही कामे आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मात्र पीएसडी रक्कम ठेकेदाराकडून जमा न करता कामे करण्यात आली. नियमानुसार कामाचे अवार्ड झाल्यानंतर २८ दिवसांच्या आत ठेकेदाराला पीएसडी रक्कम जमा करावी लागते.
मात्र कामे सुरु होऊन दोन महिने उलटले तरी ठेकेदारांनी रक्कमच सिव्हील विभागात जमा केली नाही. सिव्हील विभागाचे प्रमुख अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करुन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ठेकेदारांना सहकार्य करीत असल्याचे चित्र समोर येत आहे. (वार्ताहर)