लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आपल्या विविध मागण्या वारंवार रेटून धरल्यानंतर त्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने शुक्रवारी आॅटोरिक्षाचालकांनी अचानक संप पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. शहरी दळणवळणात महत्त्वाचा घटक मानला जाणाऱ्या आॅटोरिक्षाचे चाकं थांबल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांपासून प्रवाशांचे मोठे हाल झाले. दुसरीकडे एकही आॅटो शहरात धावत नसल्यामुळे एरवी जाणवणाऱ्या वाहतूक कोंडीतून चंद्रपूरकरांना आज मुक्ती मिळाली होती.आॅटोरिक्षा चालकांच्या विविध समस्यांची अद्यापही प्रशासनाकडून सोडवणूक करण्यात आली नाही. त्यांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. आपल्या विविध मागण्यांची पूर्तता व्हावी म्हणून महाराष्ट्र आॅटोरिक्षा चालक-मालक असोसिएशनच्या नेतृत्वात जिल्हाभरातील आॅटोरिक्षा चालकांनी विविध आंदोलने केली. मोर्चे काढले, धरणेही दिले. मात्र त्यांच्या मागण्याकडे प्रशासन अद्यापही गंभीरतेने बघायला तयार नाही. त्यामुळे आॅटोरिक्षा चालकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आॅटोरिक्षा चालकांनी शुक्रवारी अचानक संप पुकारला. सकाळपासूनच शहरात एकही आॅटो धावला नाही. त्यानंतर सर्व आॅटोरिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच दिवसभर धरणे दिले. धरणे आंदोलनादरम्यान महाराष्ट्र आॅटोरिक्षा चालक-मालक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सायंकाळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या आंदोलनात असोसिएशनचे संस्थापक राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष बळीराज शिंदे, जिल्हा सचिव सुनील धंदरे, मधुकर राऊत जहीर दिन महमूद शेख, जाफीर महमद जमीर शेख, रवींद्र आंबटकर, कुंदर रायपुरे, विनोद चन्ने, राजू मोहुर्ले, रमेश मून, जनार्धन गुंजेकर, सुनील पाटील, मंगेश चवरे, खुशाल आंबटकर यांच्यासह सर्व आॅटोरिक्षा चालक सहभागी झाले होते.अशा आहेत मागण्याआॅटोरिक्षा चालकाचा परवाना, बॅच व गणवेशाची नियमित तपासणी करावी, स्क्रॅप झालेल्या आॅटोरिक्षा शहरात धावत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, चंद्रपूर जिल्ह्याकरिता आॅनलाईन परमीट वेबसाईट बंद करण्यात यावी, चंद्रपुरातील ५७ आॅटोरिक्षा स्टॅन्डची नव्याने पूर्तता करून त्याची यादी संघटनेला देण्या यावी, आॅटोरिक्षाची पासींग आरटीओ कार्यालयातूनच करण्यात यावी, आरटीओ कार्यालयात आॅटोचालकांसाठी स्वतंत्र खिडकीची व्यवस्था करावी, आदी अनेक मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.साधे रिक्षा दिसेच ना !चंद्रपुरात आॅटोरिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे साधे रिक्षे चंद्रपुरातून नामशेष होत आहेत. सध्याच्या गतीमान जीवनशैलीमुळे लोकांकडे वेळ कमी असल्याने साध्या रिक्षाला नागरिकही पसंती देत नाही. मात्र आज बसस्थानकावर व रेल्वेस्थानकावर आॅटोरिक्षा नसल्याने प्रवाशी साधा रिक्षा शोधत होते. मात्र साधे रिक्षेच दिसत नसल्याने त्यांच्या पदरी घोर निराशाच येत होती.प्रवाशांचे हालआॅटोरिक्षांच्या संपाबाबत अनेक प्रवाशी अनभिज्ञ होते. त्यामुळे बाहेरगावावरून बस आणि रेल्वेने चंद्रपुरात येणाऱ्या प्रवाशांचे शुक्रवारी मोठे हाल झाले. सोबत असलेले बॅग्स, लगेज त्यांना हातात घेऊनच पायीच इप्सितस्थळ गाठावे लागले. अनेकजण आपल्या नातेवाईकांना वाहन घेऊन बोलविताना दिसून आले. मात्र शासकीय वा इतर कामकाजासाठी आलेल्यांना मात्र पायीच शहरातून फिरावे लागले.विद्यार्थ्यांची गैरसोयनर्सरीपासून दहाव्या वर्गापर्यंतची बहुतांश मुले आॅटोरिक्षांनीच शाळेत जातात. शुक्रवारी आॅटोचालकांनी संप पुकारल्यामुळे सकाळपासून शहरात एकही आॅटो धावला नाही. त्यामुळे शाळकरी मुलांची मोठी गैरसोय झाली. बहुतांश पालक आपल्या पाल्यांना स्वत:च्या वाहनात शाळेत नेताना व आणताना दिसून आले. मात्र कार्यालयीन कामकाजामुळे अनेक पालकांना पाल्यांना शाळेत पोहचविणे शक्य नसल्याने त्यांच्या पाल्यांना शाळेला अकारण बुटी मारावी लागली.
आॅटोरिक्षांची चाके थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 1:02 AM
आपल्या विविध मागण्या वारंवार रेटून धरल्यानंतर त्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने शुक्रवारी आॅटोरिक्षाचालकांनी अचानक संप पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. शहरी दळणवळणात महत्त्वाचा घटक मानला जाणाऱ्या आॅटोरिक्षाचे चाकं थांबल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांपासून प्रवाशांचे मोठे हाल झाले.
ठळक मुद्देसंपामुळे सामान्यांचे हाल : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे