लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आरोग्य विभागाला यश येऊ लागल्याने ज्येष्ठ नागरिक व व्याधीग्रस्तांची आता केंद्रावर गर्दी वाढू लागली. सोमवारपर्यंत जिल्ह्यात ३५ हजार ९१८ जणांनी लस घेतली. काही केंद्रांवर विलंब होत असल्याने आमचा नंबर केव्हा लागणार, असा प्रश्न ज्येष्ठ विचारू लागलेत. दरम्यान, लस घेण्यासाठी ताटकळत होऊ नये, म्हणून चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. मंगळवारी आरोग्य विभागाने नवीन १८ केंद्रांना मंजुरी दिली आहे.कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी १ मार्चपासून ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील नागरिकांच्या (ज्यांना इतर आजार आहेत) लसीकरणासाठी नोंदणी सुरू झाली. जिल्ह्यात २० शासकीय लसीकरण केंद्रात मोफत आणि सात खासगी रूग्णालयात अडीचशे रूपयात लस देण्याचा निर्णय झाला. सर्व शासकीय शासकीय केंद्रात लसीकरण सुरू झाले. पण, सामान्य नागरिकांचा ओढा शासकीय लसीकरण केंद्राकडेच असल्याने गर्दी दिसून येत आहे. यावर पर्याय म्हणून जिल्ह्यात व चंद्रपूर मनपा आरोग्य विभाग अंतर्गत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या केंद्रांची जागा लवकरच जाहीर केली जाणार आहे. को-विन अॅपवरील नोंदणी व नवीन मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याच्या सूचना असल्याने लसीकरणाला थोडा विलंब होत आहे. या विलंबावर मात करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. बुधवारपासून १८ केंद्रांवर लसीकरण होणार असल्याने प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी केली आहे.
असे आहेत जिल्ह्यातील १८ नवीन केंद्रजिल्ह्यात बुधवारपासून १९ नवीन लसीकरण केंद्र सुरू होणार आहेत. या केंद्रांमध्ये ब्रह्मपुरी ब्लॉक अरहेर नवरगाव, मुडझा, मेंडकी व चौगान आरोग्य केंद्र, चंद्रपूर ब्लॉक चिचपल्ली, गोंडपिपरी ब्लॉक तोहेगाव, कोरपना मांडवा व नारंदा, मूल तालुका चिरोली, नागभीड ब्लॉक नवेगाव पांडव व वाढोना, पोंभुर्णा ब्लॉक नवेगाव मोरे, सावली तालुक्यात अंतरगाव व बोथली, सिंदेवाही ब्लॉक मोहाडी नलेश्वर, वासेरा, वरोरा ब्लॉक शेहाण बुजुर्ग, कोसारसर व आयुर्वेदिक दवाखाना टेंभुर्डा आदी केंद्रांचा समावेश आहे.
कर्मचारीअभावी पोलीस लसीकरण केंद्राचे मनपाकडे हस्तांतरणपोलीस विभागासाठी स्वतंत्र केंद्र सुरू झाले होते. केंद्रात सामान्य नागरिकांना लस मिळत नव्हती. मात्र, या केंद्रात आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसल्याने समस्या निर्माण झाली. अखेर मनपा आरोग्य विभागाने हे केंद्र स्वत:कडे घेतले. शिवाय, बंगाली कॅम्प व अन्य ठिकाणी लसीकरण केंद्रांची तयारी केली आहे.
६ हजार १७६ ज्येष्ठांचे लसीकरणसोमवारपर्यंत ६ हजार १७६ व्याधीग्रस्त व ज्येष्ठांनी पहिल्या टप्प्यातील लस घेतली. कोविड लस घेणाऱ्या सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असा दावा जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, चंद्रपूर मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे यांनी केला आहे.
चंद्रपुरातील ‘त्या’ खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरूशासकीय केंद्रात लसीकरण सुरू असतानाच शासनाने खासगी केंद्रासाठी नवीन निकष लागू झाले. त्यामुळे डॉक्टरांनी चार दिवसांची मुदतवाढ मागितली. परिणामी, मानवटकर, क्राईस्ट, वासाडे, बुक्कावार, संजीवनी, मुसळे खासगी हॉस्पीटलमधील कोरोना लसीकरण लांबणीवर गेले. आवश्यक सुविधांची व्यवस्थांची पुर्तता झाल्यानंतर सहा खासगी केंद्रांमध्येही आता लसीकरण सुरू झाले आहे.