विद्रूप कोण झाले ?
By admin | Published: August 30, 2014 11:33 PM2014-08-30T23:33:18+5:302014-08-30T23:33:18+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यात श्रमिक एल्गारच्या अॅड.पारोमिता गोस्वामी यांनी वरोऱ्यात जावून पालकमंत्र्यांच्या गावात (अर्थात शासनाच्या दारात) मुंडण केले.
गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यात श्रमिक एल्गारच्या अॅड.पारोमिता गोस्वामी यांनी वरोऱ्यात जावून पालकमंत्र्यांच्या गावात (अर्थात शासनाच्या दारात) मुंडण केले. त्यानंतर अगदी काल-परवा बल्लारपूर पेपर मिलमधील कामगारांच्या वेतनातील फरक मिळण्यासाठी कामगार नेत्या अॅड. हर्षल चिपळूणकर यांनी चंद्रपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे (अर्थात प्रशासनाच्या दारात) मुंडण केले. खरे तर केस हा स्त्रीचा दागिना आणि श्रृंगार असतो. महाराष्ट्रात फार पूर्वी सतीप्रथा होती. पतीच्या मृत्यूनंतर स्त्रियांचे बळजबरीने केशवपन करण्याचीही क्रूर पद्धत होती. मात्र महात्मा ज्योतिबा फुले, राजा राममोहन रॉय यांनी ती बंद पाडली. महिलांना विद्रूप केले जाऊ नये, त्यांचे हक्क त्यांना मिळावे, सन्मानाने जगता यावे, यासाठी हा लढा होता. मात्र दुर्दैवाने याच पुरोगामी महाराष्ट्रात चंद्रपुरात महिलांवर मुंडण करण्याची पाळी आली आहे. दोन्ही घटनांमध्ये मुंडण करणाऱ्या केवळ दोघीच नाहीत, तर त्यांच्यासह अनेकींनीही मुंडन केले आहे.
खरा प्रश्न, या मुंडणाने विद्रूप कोण झाले, हा आहे. मुंडणाने या स्त्रीया विद्रूप मुळीच झाल्या नाहीत. उलट त्यांच्या मर्र्दुमकीमध्ये यामुळे भरच पडली आहे. जिल्ह्यात दारूबंदीची मागणीअॅड. पारोमिता गोस्वामी आणि गावखेड्यातील अनेक महिलांकडून होत आहे. दारूच्या व्यसनापायी गावेच्या गावे विद्रूप होत आहेत.
अनेकांच्या संसाराची राखरांगोळीही दारूच्या गुत्तामुळे होत आहे. गावे भकास करणाऱ्या या व्यसनाला हद्दपार करण्यासाठी मायमाऊल्यांचा लढा आहे. त्यासाठी त्यांनी नागपूरच्या अधिवेशनावर पायदळ मोर्चा नेला. निवेदने दिली. सरकारनेही अहवाल तयार केला. मुख्यमंत्र्यानी तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपुरात येऊन, निवडणुकीनंतर दारूबंदीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द दिला होता. मात्र सत्ता संपायला आली तरी हालचाल दिसत नसल्याने महिलांच्या संयमाचा बांध सुटला. पालकमंत्र्यांच्या गावात या माऊल्यांनी मुंडण करून जो संदेश द्यायचा तो दिला.
बल्लारपूर पेपर मिलमधील कामगारांच्या वेतनातील फरकाचेही असेच झाले. न्यायालयाने निर्णय दिला. प्रशासनाला आणि व्यवस्थापनाला अंमलबजावणी करण्यास सांगितले. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या कोर्टात चेंडू पोहोचला. मात्र कामगारांच्या पदरी निराशाच आली. न्यायदेवतेला रक्ताभिषेक झाला. अखेर येथेही महिलांनी प्रशासनाच्या दारापुढे केशवपन केले.
ज्या चुकांमळे गावे, घरे, गरीबांचे संसार उध्वस्त झालेत, ते सावरण्यासाठी आणि झाली चूक टाळून नवे वातावरण निर्माण व्हावे यासाठी मुंडण करणाऱ्या या महिला झाल्या नाहीत, तर शासन आणि प्रशासनच या कृतीमुळे विद्रूप झाले आहे. समाजघटकांसाठी झटणारे सरकार आणि अधिकारीे एवढे निबर असावेत का, असा प्रश्नही आता सर्वानी मनाला विचारण्याची वेळ या महिलांनी आणली आहे.
याच महाराष्ट्रात आठ दहा वर्षांपूर्वी शबाना आझमी नावाच्या नटीने ‘वॉटर’ नावाच्या चित्रपटातील भूमिकेसाठी मुंडण केले होते. तेव्हा केवढा गहजब माजला होता ! पुरोगामी-प्रतिगामी सारचे त्या मुंडणावर तुटून पडले होते. आज अभिनयासाठी नव्हे तर सामाजिक प्रश्नसाठी शंभरावर महिलांनी मुंडण केले आहे. पण या मुंडणाच्या कृतीवर माजलेला गहजब ज्यांनी मनावर घ्यावा, त्यांनी अद्याप कानावरही घेतलेला दिसत नाही. यामुळे ही संघर्षाची धार बोथट होण्याऐवजी वाढतच राहिली तर या धारेवर चढणाऱ्यांना उद्या कुणी वाचवू शकणार नाही, हे मात्र तेवढेच खरे !