सास्ती : राजुरा विधानसभा क्षेत्रातून जाणाऱ्या बामणी-राजुरा-लक्कडकोट व राजुरा-गडचांदूर-कोरपना-आदिलाबाद राज्य सीमा या दोन चौपदरी महामार्गांच्या कामाला हिरवी झेंडी मिळाली आहे. २०१९ मध्ये भूमिपूजनानंतर थंडबस्त्यात असलेल्या प्रकल्पाला सुरुवात करण्यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी पुढाकार घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या चंद्रपूर भेटीत समस्या मांडली व याची दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी घेत प्रकल्प सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले.
त्यामुळे अंदाजे एक हजार ९०० कोटी प्रस्तावित किंमत असलेल्या या चौपदरी महामार्गाचे काम मार्गी लागलेले आहे. याबाबत गॅझेट नोटिफिकेशन ३१ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध झाले. यामुळे या भागातील वाहतुकीची समस्या मार्गी लागण्याची आशा पल्लवित झालेली आहे.
या प्रकल्पाबाबत जमीन भुअर्जन करण्यासाठी व इतर समस्या मार्गी काढण्यासाठी नागपूर विभागीय आयुक्ताकडे ३ फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केलेला होता.
चंद्रपूर-बल्लारशा-राजुरा-लक्कडकोट ते तेलंगणा राज्य सीमेपर्यंत असलेला चारपदरी महामार्ग क्र. ९३०-डी या महामार्गाचे बामणी - लक्कडकोट ते राज्य सीमेपर्यंत अंदाजे ३३ किलोमीटर लांबीचा रस्ता व बामणी ते कोरपना आदिलाबाद सीमेपर्यंत जुळणाऱ्या ५६ किलोमीटर लांबीच्या चौपदरी महामार्गासाठी अंदाजे एक हजार ९०० कोटी खर्च येणार आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी २०१९ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तीन महामार्गाचे भूमिपूजनही बामणी येथे करण्यात आले होते. त्यानंतर बामनी ते आष्टी महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली व ते काम पूर्णत्वास आले आहे. मात्र, बामणी ते लक्कडकोट व बामणी ते कोरपना आदिलाबाद महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे हा प्रकल्प रखडलेला होता. या महामार्गाच्या कामाचा प्राधान्यक्रमही बदलण्यात आलेला होता.
हे दोन्ही रस्ते अत्यंत महत्त्वाचे व आंतरराज्य वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणारे आहेत. मात्र, आता या मार्गाच्या अडचणी दूर झाल्या आहेत. हा महामार्ग पूर्णत्वास आल्यास राजुरा, कोरपना व गडचांदूर शहरासोबत महामार्गालगतच्या गावांचा चेहरामोहरा बदलू शकतो.