राशन दुकानात काम वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:22 AM2021-05-29T04:22:08+5:302021-05-29T04:22:08+5:30
बाबूपेठ पुलाचे काम गतीने करावे चंद्रपूर : येथील बाबूपेठ रेल्वे पुलाचे काम रखडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत ...
बाबूपेठ पुलाचे काम गतीने करावे
चंद्रपूर : येथील बाबूपेठ रेल्वे पुलाचे काम रखडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाचे बांधकाम त्वरित करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
वीज खांबामुळे अपघाताचा धोका
चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खांब बदलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलविण्याची मागणी करण्यात आली होती. आता पावसाळ्याचे दिवस सुरु होणार आहे. त्यामुळे या दिवसापूर्वी खांब बदलविण्याची मागणी करण्यात आली आहे.
बांधकामाला गती देण्याची मागणी
चंद्रपूर : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने शहरातील वर्दळ कमी आहे. पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र ग्रामीण भागातील काही बांधकामे रखडल्याने त्या कामाला गती द्यावी, अशी मागणी होत आहे.
आठवडी बाजाराचा अनेकांना विसर
चंद्रपूर: कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, आठवडी बाजारही बंद आहे. त्यामुळे विक्रेते व ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. बाजारातून ग्रामपंचायत, नगर परिषदेला मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. अनेक विक्रेत हातठेल्यावर भाजीपाला विक्री करीत आहेत.
ओपन स्पेस कचऱ्याचे केंद्र
चंद्रपूर : प्रत्येक वाॅर्डात ओपन स्पेस तयार करून संरक्षक भिंती बांधण्यात आल्या. काही ठिकाणी लोखंडी गेट उभारण्यात आले. मात्र या ओपन स्पेसवर नियंत्रण न ठेवल्याने या ओपन स्पेसमध्ये कचरा टाकला जात आहे. अनेक ठिकाणी तर दारुच्या बाटल्यांचा खच आढळून येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
पीककर्ज रक्कमेची मर्यादा वाढवा
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे उपजीविकेचे साधन शेतीवर अवलंबून आहे. शेतीतून खरीप व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे पीककर्ज रकमेची मर्यादा वाढविण्याची मागणी आहे.
उघड्यावर पदार्थ विक्री थांबवावी
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. प्रशासनाच्या परवानगीने काही व्यवहार सुरु करण्यात आले आहे. मात्र शहरात काही भागात उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री केली जात असल्यामुळे यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
व्यावसायिकांचे कर्ज माफ करावे
चंद्रपूर : लॉकडाऊनमुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनेक नागरिकांनी व्यवसाय थाटण्याकरिता घेतलेले कर्ज माफ करावे, अशी मागणी केली जात आहे. व्यवसाय बंद पडल्याने कर्ज कसे भरावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
जिल्ह्यात उद्योगांची निर्मिती करावी
चंद्रपूर : जिल्ह्यात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आता लॉकडाऊनमुळे बेरोजगारांमध्ये नैराश आले आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या पुरेशा सोई उपलब्ध नसल्यामुळे युवकांमध्ये निराशा पसरत आहे. तालुक्यात रोजगाराची कोणतीही साधने नाहीत. उद्योगांचा अभाव आहे. त्यामुळे शेतीवर आधारित लघुउद्योगांची उभारणी करावी, अशी मागणी तालुक्यातील युवकांनी केली आहे.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला
चंद्रपूर: लॉकडाऊनमध्ये प्रशासकीय यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात असल्याची संधी साधत काही व्यावसायिक मोठ्या प्रमाणात शहरात प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणात वाढ
चंद्रपूर : वाहनांवर कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भर रस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी आहे. असे असतानाही काही तरुण मोठ्या प्रमाणात दुचाकीवर हॉर्न लावून वाजवितात. त्यामुळे अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.