चंद्रपूर : विविध जाती, धर्म, पंथांनी नटलेला आपला भारत देशात प्रत्येक धर्माच्या चालीरीती, रीतिरिवाज संस्कृती जरी वेगळी असली तरीपण भारतीयतेच्या मूळ धाग्यात सर्वजण जोडल्या गेले आहेत. देशाच्या एकात्मतेसाठी सामाजिक ऐक्याची गरज आहे. राष्ट्रीय एकात्मता हेच देशाची ताकद आहे .यासाठी राष्ट्रसंतांचा मानवधर्म प्रत्येकाने स्वीकारावा व शोषित, पीडितांच्या सेवेसाठी समर्पित भावनेतून काम करावे, असे मत हरिभक्त परायण महाराज देवीदास कुनघाडकर यांनी व्यक्त केले.
जय पेरसापेन देवस्थान मंडळ, बाबूपेठच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मंचावर आत्माराम मडावी, नथूजी गेडाम, कार्तिक कोडापे, श्याम गेडाम यांची उपस्थिती होती. यावेळी कुनघाडकर यांनी राष्ट्रसंतांचे विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण जनजागृती, स्त्री-भ्रूण हत्या, व महिला सबलीकरण, राष्ट्रीय एकात्मता, व्यसनाधीनता, स्वच्छतेचे महत्व, ग्रामसमृद्धी, सर्वधर्मसमभाव आदी विषयांवर मार्गदर्शन केले. नवसमाज निर्मितीसाठी प्रत्येकाने राष्ट्रसंतांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन देवीदास कुनघाडकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सच्चिदानंद भजन मंडळ नगिनाबाग येथील सदस्यांनी राष्ट्रसंतांची भजने गाऊन सामाजिक प्रबोधन केले.