वाढीव मानधनासाठी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:51 AM2021-02-18T04:51:10+5:302021-02-18T04:51:10+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी वाढीव मानधन व एरिअसच्या मागणीसाठी मंगळवारी काम बंद आंदोलन केले. राष्ट्रीय ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी वाढीव मानधन व एरिअसच्या मागणीसाठी मंगळवारी काम बंद आंदोलन केले.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत मागील पंधरा वर्षांपासून कंत्राटी स्वरूपात आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. सेवेत कायम करण्यात यावे, वेतन निश्चिती करण्यात येऊन फरकाची रक्कम देण्यात यावी ही मागणी घेऊन अनेकदा आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, ऑक्टोबर २०२० मध्ये शासनाने वाढीव मानधन देऊन एरिअस देण्याचे मान्य केले होते आणि राज्यातील काही जिल्ह्यांत वाढीव मानधन दिले जात आहे; परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना याचा अजूनही लाभ मिळाला नाही. यामुळे शासनाचे लक्ष वेधून मागण्यांची पूर्तता त्वरित करण्यात यावी म्हणून मंगळवारी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले. त्या अनुषंगाने राजुरा तालुक्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभागी होऊन मागणीचे निवेदन तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले.