वीज कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:57+5:302021-06-03T04:20:57+5:30
विविध मागण्यांची पूर्तता करा वरोरा : कोरोना विषाणूच्या काळात वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार यांनी अहोरात्र कामे ...
विविध मागण्यांची पूर्तता करा
वरोरा : कोरोना विषाणूच्या काळात वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार यांनी अहोरात्र कामे केली. अनेक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे वीज अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी प्रशिक्षणार्थी यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करावे व ५० लाखांचे विमा सुरक्षा कवच द्यावे आदी मागण्या तातडीने मंजूर करावीत. अन्यथा वीज कर्मचारी अभियंता संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते. असे असतानाही वीज कामगार, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कामगार यांनी वीज निर्मिती वहन व वितरणाचे काम रात्रंदिवस केले. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती घरी राहू शकले. रुग्णालय, कोविड रुग्णालय, पाणीपुरवठा, दिवाबत्ती येथील वीज सुरळीत राहिली. वीज उद्योगात काम करणाऱ्या वीज अभियंते, अधिकारी तसेच कंत्राटी कामगार यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे प्रथम कोविड लसीकरण करावे, कोविडमुळे मरण पावलेल्या वीज कामगारांना महाराष्ट्र शासनाप्रमाणे ५० लाखांचे विमा कवच द्यावे, वीज बिल वसुलीबाबत सक्ती करू नये आदी मागण्या तत्काळ मंजूर कराव्या. अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने देण्यात आला. या संदर्भातील निवेदन खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर, वीज कामगार महासंघाचे सचिव शंकर पदाड, विद्युत क्षेत्र कामगार तांत्रिक कामगार युनियनचे सरचिटणीस आर. टी. देवाकांत, इंजिनिअर असोसिएशनचे सरचिटणीस संजय ठाकूर, वीज तांत्रिक कामगार युनियनचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन, महाराष्ट्र राज्य कामगार काँग्रेस मुख्य महासचिव दत्तात्रय गुते आदी उपस्थित होते.
===Photopath===
020621\img-20210529-wa0067.jpg
===Caption===
warora