जीर्ण वसाहतीतच वेकोलि कामगारांचा संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:38 AM2019-08-18T00:38:52+5:302019-08-18T00:39:17+5:30

चंद्रपूर जिल्ह्याला ब्लॅक गोल्डचा खजिना म्हटले जाते. वेकोलिच्या अनेक कोळसा खाणी जिल्ह्यात आहेत. या कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगार व अधिकाऱ्यांसाठी वेकोलिने वसाहती बांधल्या आहेत. मात्र वसाहतीच्या निर्माणानंतर वेकोलिने याकडे लक्षच दिले नाही.

The world of wackoli workers in a dilapidated colony | जीर्ण वसाहतीतच वेकोलि कामगारांचा संसार

जीर्ण वसाहतीतच वेकोलि कामगारांचा संसार

Next
ठळक मुद्देकधी देणार लक्ष? । कोट्यवधींचा नफा कमावणारे वेकोलि प्रशासन कामगारांप्रति निष्ठूर

रवी जवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला ब्लॅक गोल्डचा खजिना म्हटले जाते. वेकोलिच्या अनेक कोळसा खाणी जिल्ह्यात आहेत. या कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगार व अधिकाऱ्यांसाठी वेकोलिने वसाहती बांधल्या आहेत. मात्र वसाहतीच्या निर्माणानंतर वेकोलिने याकडे लक्षच दिले नाही. जिल्ह्यातील चंद्रपूर, घुग्घूस, सास्ती, धोपटाळा, दुर्गापूर, माजरी या परिसरातील वसाहतींमधील अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. भिंतींना तडे गेले आहेत. यातील काही इमारती तर अगदी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. आता पावसाळ्याचे दिवस आहेत. अनेक घरे पडून मोठी हानी होत आहे. असे असले तरी कोट्यवधींचा नफा कमावणारे वेकोलि प्रशासन कामगारांप्रति निष्ठूर झाले आहे. चंद्रपूर वेकोलितील कामगारांसाठी रय्यतवारी, लालपेठ, महाकाली कॉलरी या परिसरात प्लस आणि मायनस वसाहती आहेत. यातील मायनस क्वार्टरमधील अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. सुमारे ५०-६० वर्षांपूर्वी या इमारती बांधल्या आहेत. त्यामुळे त्या निश्चितच निर्लेखित झाल्या आहेत. घुग्घूस येथेही कामगारांच्या लोकवसाहती आहेत. त्या वसाहतमधील क्वार्टरला भेगा पडलेल्या आहेत. हे क्वार्टर केव्हा पडेल, याचा नेम नाही. त्यामुळे कामगाराचा व त्यांच्या कुटुबीयांचा जीव धोक्यात आला आहे. वेकोलि वणी क्षेत्राअंतर्गत घुग्घुस, नायगाव, निलजई, उकणी, मुंगोली, कोलगाव, पैनगंगा कोळ्सा खाणी आहेत. कामगारासाठी घुग्घुस येथे ३० वर्षांपूर्वी विविध कामगार वसाहतीमध्ये क्वार्टर बनविण्यात आले. त्यानंतर सुंदरनगर व कैलाशनगर (मुंगोली) परिसरात कामगार वसाहत आहे. सर्व मोडकडीस आल्या आहे.

क्वार्टरमधूनही पाणी गळते
घुग्घुस येथील अनेक वसाहतीतील क्वार्टरच्या भिंतीला भेगा पडल्या आहेत. खिडक्या, दरवाजे तुटलेले आहे. शौचालयाचे गटर फुटले आहे. आता पावसाळ्यात तर या वसाहतीची आणखी दुर्दशा झाली आहे. अनेक इमारतींमधून पाणीही गळते, अशा तक्रारी आहेत. जुन्या इमारती असल्यामुळे घरात कोंदट आणि गुदमरुन टाकणारा वास पसरला असतो. याबाबत वारंवार कामगार तक्रारी करतात. मात्र त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जाते.

राजुरा, भद्रावती तालुक्यातही भूमिगत व ओपनकॉस्ट कोळसा खाणी आहेत. येथेही सुमारे ४० वर्षांपूर्वी वेकोलिने कामगारांसाठी वसाहती बांधल्या आहेत. या वसाहतीमधील क्वार्टरचीही तशीच स्थिती आहे. क्वार्टरची डागडुजी करण्यात यावी, किंवा नवीन वसाहती निर्माण कराव्या, अशी मागणी कामगारांकडून व्यवस्थापनाकडे वारंवार केली जात आहे. विविध कामगार संघटनांकडेही कामगारांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र संघटनाही याकडे सध्या लक्ष द्यायला तयार नाही.

वेकोलिच्या क्वार्टरमध्ये अनेकदा किरकोळ अपघात घडले आहेत. काही महिन्यांपूर्वी सुंदरनगरमध्ये एक इमारत पडली होती. काही महिन्यांपूर्वी सुंदरनगर येथीलच एका दुमजली क्वार्टरच्या वरच्या मजल्याची गॅलरी कोसळली. अनेकदा भिंतीचे प्लॅस्टर पडले आहेत. घुग्घूस येथील कामगार वसाहतीमधील पाणी पुरवठा योजनेची वरची टाकीच कोसळली होती. राजुरा तालुक्यातील अनेक कामगार वसाहतीमधील भिंतींना तडे गेल्याचे स्पष्ट दिसून येते.

Web Title: The world of wackoli workers in a dilapidated colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.