लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून ऐतिहासिक रामाळा तलावाच्या संवर्धन तसेच प्रदूषणाबाबत इको-प्रोने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात आता सामाजिक संघटनांसह सामान्य नागरिकही जुळत आहे. दरम्यान, रामाळा तलावातील प्रदूषणाची पातळी मोठी असून, ते पाणी पिण्यायोग्य नसून, जलचल प्राण्यांनाही धोकादायक ठरत आहे. यासंदर्भात वर्षभरापूर्वीच म्हणजे, १४ फेब्रुवारी २०२० लाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून अवगत केले होते. मात्र महापालिका प्रशासनाने या पत्राकडे दुर्लक्ष केल्याचे आता समोर आले आहे.येथील ऐतिहासिक रामाळा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात असल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे तलावाचे अस्तित्व नष्ट होत असून, या पाण्यामुळे मानवासह इतर पशुपक्षांनाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, तलाव भरल्यानंतर ते पाणी लगेच नदीत जाऊन नदी प्रदूषित होत आहे. त्यामुळे इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले.विशेष म्हणजे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने ५ मार्च २०२० तसेच १३ मार्च २०२० ला तलावाच्या पाण्याचे नमुने घेतले होते. या नमुन्याच्या पृथ्थकरण अहवालातून बीओडीचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे म्हटले आहे. घरगुती सांडपाण्यामुळे ते प्रमाण वाढण्याची शक्यताही व्यक्त केली होती. तसेच एसएस, टीडीएस, आर्यन, शिशे आदीचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचेही नमूद केले होते. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २५ फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे मनपाने वर्षभर काहीच का केले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.नमुने घेण्यापूर्वीच मनपाला पत्रमहाराष्ट्र प्रदूषण मंडळाने ५ मार्च २०२० तसेच १३ मार्च २०२० ला रामाळा तलावाच्या पाण्याचे नमुने घेतले होते. यापूर्वीच म्हणजे १४ फेब्रुवारी २०२० ला महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून पाणी प्रदूषित असल्याचे कळविले होते. हे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने २५ फेब्रुवारी २०२१ ला जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रातून स्पष्ट होत आहे. प्रदूषण मंडळाने तत्परता दाखविली असतानाही महापालिका प्रशासनाने रामाळा तलावातील प्रदूषणाकडे मात्र दुर्लक्ष केले आहे.