१ लाख ६ हजार शेतकऱ्यांनी काढला पीक विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:47 AM2018-08-03T00:47:58+5:302018-08-03T00:48:33+5:30
वैजापूर तालुका जिल्ह्यात अव्वल : अनंत अडचणींचा सामना करुन नोंदवला विक्रम
वैजापूर : पीक विम्याचे अर्ज भरण्यासाठी ३१ जुलै या अंतिम दिवसापर्यंत तालुक्यातील १ लाख ६ हजार ८७६ शेतकºयांनी पीक विमा काढला. विशेष म्हणजे या विम्याचे अर्ज भरण्यासाठी दररोज आॅनलाइन केंद्रावर सर्व्हर डाऊनची डोकेदुखी असतानाही जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरण्याचा विक्रम तालुक्यातील शेतकºयांनी केल्याची माहिती कृषि विभागाकडून देण्यात आली.
तालुक्यातील शेतकºयांची भिस्त ही खरीप पिकांवर अवलंबून आहे. परंतु दोन महिन्यांपासून अनेक संकटांमुळे शेतकºयांनी पिकावर केलेला खर्चही उत्पन्नातून निघणार नसल्याचे ध्यानी घेऊन पीक विम्याला पसंती दिली.
त्यामुळे तालुक्यातील १ लाख ६ हजार ८७६ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा भरण्याचा विक्रम केला. कापूस ३० हजार १३३, मूग १० हजार ९१३, मका २३ हजार १५१ आदी पिकांचा विमा कंपनीकडे ३१ जुलैपर्यंत भरला आहे. तालुका बंद, सर्व्हर डाऊन आदी कारणांनी तालुक्यातील अनेक शेतकरी पीक विमा भरण्यापासून अजून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात २०१७ मध्ये विमा कंपनीने नुकसान होऊनही शेतकºयांना मदत नाकारली होती. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. त्यानंतर शासनाने याची दखल घेऊन या कंपनीकडून तालुक्याचे काम काढून २०१८ वर्षासाठी दुसºया कंपनीकडे दिले असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी अनिल कुलकर्णी यांनी दिली.
दरम्यान, तांत्रिक कारणामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी विमा कंपनीने दिलेल्या मुदतीत आपले प्रस्ताव दाखल करु शकले नाहीत. त्यामुळे विमा कंपनीने किमान १५ दिवस विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकºयांमधून होत आहे.
दुष्काळाची धास्ती
दोन महिन्यांपासून पाऊस गायब झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. डोळ्यासमोर दुष्काळाचे वास्तव दिसत असल्याने शेतकºयांनी शेवटचा पर्याय म्हणून पीक विम्यावर सर्वाधिक सट्टा लावण्याचे धाडस केले. त्यामुळे शेवटच्या दिवशीच म्हणजे मंगळवारी अनेक शेतकºयांनी कापूस, मका, मूग पिकाचा पीक विमा उतरविण्यासाठी सीएसी केंद्र, बँक व डिजीटल यंत्रणेकडे गर्दी केल्याचे दिसून आले. विमा अर्ज भरण्यासाठी प्रशासनाने सात दिवसांची मुदतवाढ दिली होती, मात्र या सात दिवसांत चार ते पाच दिवस पूर्ण वेळ आॅनलाइन पोर्टल बंद होते. यापूर्वीही दररोज सर्व्हर डाऊनची समस्या आल्याने आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक रात्रंदिवस अर्ज भरण्यासाठी संगणकासमोर बसून होते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे शेतकºयांना अर्ज करत येत नसल्याचे दिसून आले.