- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : लघुसंदेशातून आलेले पैसे, अनुदान म्हणून मिळालेले पैसे, पुण्याकडून आलेला अतिरिक्त निधी, असे सर्वच पैसे विदर्भसाहित्य संघाने संपवले असून, पी.डी. पाटील यांच्या देणगीतीलसुद्धा ६ लाख खर्च केले आहेत. पी.डी. पाटील यांनी साहित्य महामंडळाला दिलेली २५ लाखांची देणगी आम्ही मुदत ठेव म्हणून बँकेत ठेवायचो. विदर्भ साहित्य संघाने मात्र ही रक्कम चालू खात्यात ठेवली आणि दरवर्षी महामंडळाला व्याजस्वरूपात मिळणाऱ्या १ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान केले, अशी खरमरीत टीका साहित्य महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी विदर्भ साहित्य संघावर केली.
ठाले पाटील यांनी औरंगाबाद येथे बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. याविषयी ते म्हणाले की, विदर्भ साहित्य संघाने २० लाख रुपये देऊ असे सांगितले; पण आम्हाला अजून एक छदामही मिळालेला नाही. साहित्य महामंडळाच्या हस्तांतरानंतर एका घटक संस्थेकडून दुसऱ्या घटक संस्थेकडे पी.डी. पाटील यांनी दिलेली देणगी अधिक नियमित फिरता निधी म्हणून काही रक्कम जाणे अपेक्षित असते. पुण्याकडून साहित्य महामंडळ विदर्भाकडे जाताना त्यांना देणगी स्वरूपातील २५ लाख आणि दोन-अडीच लाख वर, असे जवळपास २७ लाख दिले होते; पण आता तर विदर्भ साहित्य संघाच्या या कारभारामुळे पी.डी. पाटील यांच्या निधीतूनच काम चालविण्याची वेळ आमच्यावर आली आहे. त्यांनी तर गाढवपणा केलाच; पण आता आपला खर्च कमीत कमी करून अनुदानातील रकमेत बसवून काम कसे करायचे, संमेलने कमीत कमी पैशात कशी घ्यायची, याचे आम्हाला नियोजन करावे लागणार आहे, असेही ठाले पाटलांनी नमूद केले.
संमेलन अध्यक्ष निवडीबाबत बोलताना ठाले पाटील म्हणाले की, संमेलनाध्यक्षाची निवड महामंडळाच्या घटनेनुसारच करावी लागेल. निवड म्हणजे निवडणुकीपेक्षा वेगळे, असे भासविण्याचा प्रयत्न होत आहे, तो चुकीचा आहे. १९ लोक अध्यक्ष निवडतील. मात्र, एकमताने निवड झाली असे जाहीर न करता आत जे काही घडले ते खरे-खरे जनतेसमोर आणू आणि बहुमताने उमेदवार निवडून आला आहे, असे सांगू.
महामंडळाने उपक्रम ठरवून देणे म्हणजे माझ्यादृष्टीने ४ घटक संस्थांवर अविश्वास दाखविणे आहे. महामंडळाने उपक्रम राबवावेत, असे महामंडळाच्या घटनेत कुठेही नमूद नाही. उपक्रम राबविल्यास काही बिघडत नाही; पण घटक संस्थांच्या कार्यक्षेत्रात महामंडळाने असे करणे म्हणजे घटक संस्थांच्या कार्यावर परिणाम करणारे आहे. आपापल्या क्षेत्रात काय करायचे आहे, हे घटक संस्थांना ठरवू द्या. श्रीपाद जोशींनी सांगितलेले उपक्रम आपण आपल्या प्रांतात राबविले नाही. हे उपक्रम राबविण्यासाठी मसापला देऊ केलेला निधी तुम्ही आंध्र (हैदराबाद) आणि क र्नाटक (गुलबर्गा) यांना द्या, असेही आपण सूचित केल्याचे ठाले पाटील यांनी स्पष्ट केले.
भाषिक प्रश्न मांडणे हे महामंडळाचे मुख्य काम मराठी लेखनातला स्वैरपणा घालवून त्यात एकसूत्रीपणा आणण्यासाठी साहित्य महामंडळाची सुरुवात झाली. संमेलन घेणे हे साहित्य महामंडळाचे मुख्य काम नाही. ही पाचवी घटक संस्था नाही, तर ४ घटक संस्थांचा तो एक संघ आहे. एका व्यासपीठावरून भाषिक प्रश्न सोडविण्यात यावेत, म्हणून प्रामुख्याने महामंडळ सुरू झाले, असा इतिहासही यावेळी ठाले पाटील यांनी सांगितला.
भाषा संकोच या प्रश्नावर काम करणार२००९ साली साहित्य महामंडळ आपल्याकडे आल्यावर मी लिपीचा प्रश्न मांडला होता आणि त्याचा जीआरसुद्धा मंजूर क रून आणला होता. आता भाषा संकोच, हा प्रश्न मला वाटतो आहे. पूर्वी मराठी भाषा देशात बहुतेक सर्व विद्यापीठांत शिकविली जायची. च्आज खूप वेगळी परिस्थिती आहे. वापी, सुरत, बडोदा, भालकी, अदिलाबाद, बºहाणपूर यासारख्या प्रांतातील मराठी लोक जोडून ठेवण्यात, तेथे भाषेची आस्था कायम ठेवण्यात आपण कमी पडलो आहोत आणि याच उद्देशातून मी विश्व साहित्य संमेलनाची कल्पना मांडली होती.