औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील प्रकाशनगर येथे राहणारे मथुरा, उत्तरप्रदेश येथील दाम्पत्य वाळुज येथील खाजगी कंपनीत मोठ्या पदावर काम करतात. त्यांचा १२ वर्षांचा मुलगा सतत शेजारील मोबाईल शॉपीमध्ये जात असे. रविवारी सकाळी नऊ वाजता त्याला आईने शॉपीत जायचे नाही, असे बजावले. त्यामुळे चिडलेला मुलगा घराबाहेर निघून गेला. तो परिसरातील गल्ल्यांमध्येच फिरत राहिला. घाबरलेल्या आई-वडिलांनी मुलगा सापडत नसल्यामुळे मुकुंदवाडी पोलिसात दुपारनंतर धाव घेतली. पोलिसांच्या तत्पर शोधामुळे हा मुलगा दोन तासांतच आई-वडिलांकडे सोपविण्यात आला.
प्रकाशनगर येथे राहणारे मुकेशकुमार शिकरवार यांचा १२ वर्षांचा मुलगा जतीन याला रविवारी सकाळी ९ वाजता मोबाईल शॉपीमध्ये जाऊ नकोस म्हणून आई रागावली. आईच्या रागावण्यामुळे जतीन हा सुद्धा तेवढ्याच रागात घरातून निघून गेला. आई- वडिलांना वाटले मुलगा परिसरातच असेल. थोड्या वेळाने त्यास शोधले असता सापडला नाही. त्यामुळे घाबरलेल्या शिकरवार दाम्पत्याने परिसरात सगळीकडे शाेध घेतला, मात्र जतीन सापडला नाही. यामुळे दुपारी साडेचार वाजता त्यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली. या तक्रारीनंतर वरिष्ठ निरीक्षक मनोज पगारे, ब्रम्हा गिरी यांनी विशेष पथकासह इतर अधिकाऱ्यांना मुलाच्या शोधासाठी पथके पाठविण्याच्या सूचना केल्या. यानुसार उपनिरीक्षक अमोल म्हस्के, सुनील चव्हाण, संदीप वाघ, हवालदार नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, शिपाई मनोहर गिते, संतोष भानुसे, सुधाकर पाटील, श्याम आढे, विनोद बनकर, गणेश वाघ यांच्या पथकांनी परिसरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. या फुटेजमध्ये हा मुलगा वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये फिरत असल्याचे आढळून आले. यानुसार उपनिरीक्षक म्हस्के यांनी गुप्त बातमीदाराला मुलाचे छायाचित्र पाठविल्यानंतर मुलगा मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरातील राजनगर जवळील रेल्वे रूळाजवळ असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी जात मुलाचा ताबा घेतला. ही सर्व कारवाई अवघ्या दोन तासात करण्यात आली. मुलगा सुखरूप सापडल्यामुळे आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी तरळून आले होते.
रागावल्यामुळेच निघून गेलोआई रागावल्यामुळेच निघून गेलो. दिवसभर इकडे तिकडे फिरलो, अशी माहिती जतीन याने दिली. त्याला कुठे जायचे होते, याविषयी काहीही माहिती नव्हती. राग आल्यामुळेच जतीन याने हे कृत्य केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.