पैठण : नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून रविवारी दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीद्वारे हे पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावले आहे. रविवारी धरणात १४ हजार क्युसेस आवक सुरू होती, दरम्यान सोमवारी सकाळपासून यात मोठी वाढ अपेक्षित असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. रविवारी रात्री धरणाचा जलसाठा ५६ टक्के आहे.
या धरणाची भिस्त नाशिक जिल्ह्यातील पाणलोटक्षेत्रावर अवलंबून आहे. मात्र, यंदा नाशिकमधून पाण्याचे आगमन अद्यापपर्यंत न झाल्याने जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नव्हती. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातील पाण्याची प्रतीक्षा जायकवाडी धरणास होती. प्रचलन आराखड्यानुसार नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणे भरल्याने तेथील धरणातून रविवारी विसर्गास प्रारंभ झाल्याने जायकवाडी प्रशासनास दिलासा मिळाला आहे.
रविवारी नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातील दारणा धरणातून १००६० क्युसेस, कडवा धरणातून २२०० क्युसेस, गंगापूर धरणातून १५२०, आळंदी ३० क्युसेस, वालदेवी १८३ क्युसेस व नांदुर मधमेश्वर वेअरमधून १६५२० क्युसेस विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. दरम्यान हे पाणी गतीने जायकवाडी धरणाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून ४४०० क्युसेस क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. सोमवारी ओझर वेअरमधून प्रवरेत विसर्ग होण्याची शक्यता असल्याने जायकवाडी धरणात येणारी आवक वाढणार आहे.
दरम्यान रविवारी रात्री ८ वाजता धरणाची पाणीपातळी १५१२.८१ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा १९४८.२५२ दलघमी (६९ टीएमसी) तर उपयुक्त जलसाठा १२१०.१४६ दलघमी (४३ टीएमसी) इतका झाला आहे. यंदाच्या हंगामात स्थानिक पाणलोटक्षेत्रावर जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात २१ टक्के वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील आवक येणार असल्याने धरणाच्या जलसाठ्यात यापुढे गतीने वाढ होईल, असे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले.