चाकू हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांचे दीड लाख हिसकावले, सिडको पोलिसात जिवघेणा हल्ल्याचा गुन्हा दाखल
By राम शिनगारे | Published: June 2, 2023 09:02 PM2023-06-02T21:02:30+5:302023-06-02T21:02:48+5:30
छत्रपती संभाजीनगर : पोलिस भरतीची तयारीसाठी खेड्यातुन आलेल्या चार विद्यार्थ्यांना घरमालकाने मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. विद्यार्थ्यांवर ...
छत्रपती संभाजीनगर : पोलिस भरतीची तयारीसाठी खेड्यातुन आलेल्या चार विद्यार्थ्यांना घरमालकाने मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर त्याच्याकडून शुल्क देण्यासाठी गावाकडून आणलेले १ लाख ६० हजार रुपये घरमालकाने हिसकावून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सिडको पोलिस ठाण्यात घरमालक नारायण दत्तुपंत अहंकारी, त्याचा मुलगा लक्ष्मीकांत नारायण अहंकारी (रा. एन ९, पवननगर) यांच्या विरोधात विद्यार्थ्यांना जबर मारहाण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस भरतीची तयारी करणारा युवक प्रमोद पंढरीनाथ गायकवाड (रा. वाघोला, ता. फुलंब्री) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रमोदसह गावातीलच निवृत्ती कांबळे, अभिषेक गायकवाड आण रवी गायकवाड हे अहंकारी याच्या घरात भाड्याची खोली घेऊन राहतात.
या चौघांनी गावाकडून पोलिस भरती प्रशिक्षण संस्थेचे शुल्क भरण्यासाठी प्रत्येकी ४० हजार रुपये आणले होते. पैसे आणल्याची माहिती मिळाल्यानंतर घरमालक नारायण अहंकारी याने तुम्ही दरवाजा का उघडा ठेवला, असे विचारून विद्यार्थ्यांना शिविगाळ केली. तेव्हा विद्यार्थ्यांनी शिविगाळ का करता असा जाब विचारल्यानंतर नारायण याने मुलगा लक्ष्मीकांतला बोलावून घेतले.
तेव्हा त्याने येताच विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला चढवला. त्यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपी बापलेकाने चौघांनी गावाकडून आणलेले १ लाख ६० हजार रुपये हिसकावून घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बापलेकांनी पैशासाठीच भाडेकरू विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला केल्याचा संशय सिडको पोलिसांनी व्यक्त केला आहे. अधिक तपास निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.