जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे ४ फुटाने उचलले, ७५४५६ क्युसेक्स विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 09:07 AM2020-09-26T09:07:49+5:302020-09-26T09:13:21+5:30
गोदावरी पात्रात मोठ्या क्षमतेने विसर्ग झाल्याने गोदावरीला पूर आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पैठण - जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी रात्री पुन्हा ढगफुटी सदृश पावसाने दणका दिल्याने रात्री ११ वाजेच्या दरम्यान धरणातून होणारा विसर्ग ७५४५६ क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. गोदावरी पात्रात मोठ्या क्षमतेने विसर्ग झाल्याने गोदावरीला पूर आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आवक लक्षात घेता धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली.
जायकवाडी धरणाच्या जलाशयासह स्थानिक पाणलोट क्षेत्रात रात्री ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावल्याने धरणात येणारी आवक ६० हजार क्युसेक्स पेक्षा जास्त वाढली. धरणाचा जलसाठा ९८.६२% झालेला असल्याने खबरदारी म्हणून रात्री १०.३० ते ११ दरम्यान धरणाचे १८ दरवाजे ४ फुटाने उचलून धरणातून ७५४५६ क्युसेक्स क्षमतेपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला.