कंटेनरच्या धडकेने १८ जखमी;८गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:08 AM2018-03-20T01:08:51+5:302018-03-20T10:39:36+5:30
भरधाव कंटेनर ट्रकचे टायर फुटून झालेल्या विचित्र अपघातात १८ लोक जखमी झाले.
राजेंद्र बेलकर
करमाड : भरधाव कंटेनर ट्रकचे टायर फुटून झालेल्या विचित्र अपघातात १८ लोक जखमी झाले. तर १ ट्रॅक्टर, २ अॅपे रिक्षा, २ छोटा हत्ती, २ मोटारसायकल अशा ७ वाहनांचा चुराडा झाला. औरंगाबाद-जालना रोडवर करमाड गावाजवळ कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा अपघात झाला. अपघात होताच कंटेनरचालक घटनास्थळाहून पसार झाला. जखमींपैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना औरंगाबादमधील विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
कंटेनर ट्रक (क्र. एम. एच.४३ वाय २२६५) हे अवजड यंत्रसामग्री घेऊन औरंगाबादकडून जालनाकडे जात होते. कंटेनरसमोर ट्रॅक्टर (क्र. एम. एच २० सी. टी. ९९०५) हे खत घेऊन चालले होते. अचानक कंटेनरचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला व कंटेनर ट्रॅक्टरवर जाऊन आदळले. भरधाव कंटेनरने ट्रॅक्टरला तसेच जवळपास शंभर फूट फरपटत नेले. रस्त्याच्या कडेला चिंचेच्या झाडावर दोन्हीही वाहने जाऊन अडकली. सोमवारी करमाडचा आठवडी बाजार होता. त्यामुळे कापूस खरेदी करणाऱ्या व्यापा-यांनी जालना मार्गावर दुकाने थाटली होती. तसेच चिंचेच्या झाडाखाली टरबूज व रसवंतीचे दुकान होते. या दुकानासमोर टोणगाव, आपतगाव, पिंप्रीराजा व लाडसावंगी येथील शेतकरी कापूस विक्रीसाठी आलेले होते, तर काही लोक टरबूज घेत होते. बेसावध असलेल्या या ग्रामस्थांवर अचानक कंटेनर व ट्रॅक्टर येऊन धडकले.