औरंगाबाद : अल्पवयीन बहिणीवर अत्याचार करून तिला ‘माता’ बनविणाऱ्या नराधम भावाला सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी मंगळवारी २० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली ४६ हजार रुपये दंड ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी २५ हजार रुपये पीडितेला उपचार आणि पुनर्वसनासाठी देण्याचे आदेशात म्हटले आहे.
१४ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती आई-वडील व ३३ वर्षीय नराधम भावासह राहत होती. डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या काळात घरात कोणी नसताना भावाने तिच्यावर दोन-तीन वेळा अत्याचार केला. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. जुलै २०२१ मध्ये पीडितेचे पोट दुखत असल्याने तिला आई-वडिलांनी खासगी रुग्णालयात नेले असता, ती ७ महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. पण पीडितेने भीतीपोटी खरे सांगितले नाही. मुंबईचा मुलगा होता, तो मला सोडून गेला, त्याचे नाव व पत्ता माहिती नाही, असे भावाच्या सांगण्यावरून तिने सांगितले.
तिने आत्महत्या करण्याचे ठरविले होते. मात्र, आई-वडिलांनी व नराधमाने आपण मुलाचा सांभाळ करू, असे सांगितल्यामुळे तिने आत्महत्या केली नाही. त्यानंतर आई व नराधमाने रुग्णालयात दाखल करताना तिचे वय व नाव चुकीचे नोंदविले. तिने त्याच दिवशी मुलाला जन्म दिला. त्याची नोंद करण्यासाठी डॉक्टरांनी पीडितेचे आधार कार्ड मागितले. त्यावरून पीडितेचे नाव व वय खोटे असल्याचे स्पष्ट झाले. याची डॉक्टरांनी ‘एमएलसी’ नोंदविली होती. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक वंदना मुळे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी लोकअभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. पैरवी अधिकारी म्हणून जमादार रज्जाक शेख यांनी काम पाहिले.