छत्रपती संभाजीनगर: स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाची लगबग सुरू असताना सोयगाव वन क्षेत्रातील सरकारी गायरानात कुजलेल्या अवस्थेत बिबट्या आढळून आला. त्यामुळे वन विभागाची एकाच धांदल उडाली. चारवर्षीय नर बिबट्या नेमका कशाने मृत झाला हे कारण शवविच्छदन आहवालानंतर कळणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, जिल्ह्यात दोन वर्षांत २४ व्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बिबट्या का मरताहेत ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एक दोन नव्हे तर जिल्ह्यात मागील दोन वर्षात २४ बिबट्याने मृत्यूला कवटाळले आहे. कुणी हेतुपुरस्सर बिबट्या मारतात, काही शिकाराच्या नादात विहीरीत पडून मरतात, काही अत्यावस्थेत बिबट्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सोयगाव परिक्षेत्रांतर्गत मौजे रामपुरा गट नंबर ८१ येथे मंगळवारी (दि.१५) अंदाजे चार वर्ष वयाचा नर बिबट्या मृत्यू झाल्याचे वन कर्मचाऱ्यांना आढळून आले. सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी ए.पी. मिसाळ यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली तसेच पुढील कार्यवाहीसाठी पशुवैद्यकीय अधिकारी कांबळे, दानिक बुखारी, संजू पाटील यांच्या टीमला बोलविण्यात आले. मृत बिबट्या कधी व कशाने मृत झाला याविषयी शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होणार आहे, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकरणी पुढील तपास वनसंरक्षक एच. जी.धुमाळ,उप वनसंरक्षक एस. व्ही. मंकावार, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक रोहिणी साळुंखे (सिल्लोड), वनपरिक्षेत्र अधिकारी ए.पी. मिसाळ (सोयगाव) हे करीत आहेत.
दरम्यान, वैजापूर येथे १२ ऑगस्ट रोजी भुकेने व्याकूळ झालेला बछडा अत्यावस्थेत सापडला होता. या बछडा आता तंदुरूस्त झालेला दिसत आहे. तो पुन्हा कधी अदिवासात जाईल याकडे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.