औरंगाबाद : कृत्रिम पावसासाठी ख्याती वेदर मॉडिफिकेशनने ९ आॅगस्टपासून सुरू केलेला प्रयोग थांबविण्यात आला आहे. ३० कोटी रुपये घेऊन प्रयोगासाठी आलेले विमान उडाले आहे. तत्पूर्वी शास्त्रज्ञांनी औरंगाबाद सोडले. ५२ दिवसांसाठी हा प्रयोग करण्याचा करार होता. ९ नोव्हेंबरपर्यंत प्रयोग सुरू होता. प्रयोग थांबविण्यात आल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालक विभागाकडून सांगण्यात आले.
तीन महिन्यांतील प्रयोग काळात ९३३ फ्लेअर्स पावसासाठी राज्यातील विविध भागांत सोडण्यात आले. विमान उड्डाणावर उड्डाण घेत राहिले, त्यातून किती पाऊस पडला, याचा अहवाल महसूल प्रशासन आणि शास्त्रज्ञांनी दिला नाही. आॅक्टोबर महिन्यात झालेला पाऊस हा कृत्रिम होता की, नैसर्गिक याचेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. ३० कोटी रुपयांतून हा प्रयोग करण्यात आला. आता त्या प्रयोगाची सांगता झाली असली तरी अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आलेली नाही. आयुक्तालयाच्या चौथ्या मजल्यावर बसविण्यात आलेले रडार अजून तसेच आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ९ आॅगस्टपासून प्रयोगासाठी विमानाने उड्डाण करीत रसायनांची फवारणी केली. ९० दिवसांत ३५ दिवस प्रयोग झाला नाही. विमान व पायलटस्ने रेस्ट डे किंवा पाणीदार ढगं नसल्याच्या कारणाने ३५ दिवस उड्डाण केले नाही. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सरकारी यंत्रणेने कृत्रिम पावसाच्या प्रयोगाकडे लक्ष दिले नाही. दरम्यान परतीच्या पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावली. परतीचा पाऊस ज्या भागात पडला नाही, ज्या भागात पाऊस झाला नाही, त्या ठिकाणी कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी विमानाने उड्डाण घेतले.
प्रयोगातून किती पडला पाऊस?कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला ९ आॅगस्ट रोजी सुरुवात झाली. १६ आॅगस्टपासून कंपनीच्या विमानाचे प्रयोगासाठी नियमित उड्डाण झाले. ९ आॅगस्टपासून हिशेब केला तर आजवर ९० दिवस प्रयोगाचे झाल्याचे दिसते. ९ आॅगस्ट ते १ सप्टेंबर, १ सप्टेंबर ते १२ आॅक्टोबरअखेरपर्यंत ९३३ फ्लेअर्स विमानातून कृत्रिम पावसासाठी ढगांमध्ये सोडण्यात आले.४औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, बीड, बुलडाणा, सोलापूर या जिल्ह्यांतील गावांवरील पाणीदार ढगांमध्ये प्रयोग करण्यात आला. या प्रयोगातून किती पाऊस पडला, याची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे. दरम्यान राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी सांगितले की, प्रयोग संपल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु प्रयोग थांबविण्यात आला आहे.