३१८ रिक्षाचालकांनी भरले ३१.८० लाख रुपये; औरंगाबाद आरटीओच्या कारवाईचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 02:20 PM2017-12-27T14:20:42+5:302017-12-27T16:39:19+5:30
शहरामध्ये परवान्याकडे पाठ फिरवीत केवळ इरादापत्रावर रिक्षा चालविण्याचा प्रकार चारशेवर रिक्षाचालकांकडून सुरू होता. आरटीओ कार्यालयाने अशा रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारताच अवघ्या काही दिवसांत ३१८ रिक्षाचालकांनी काही दिवसांत ३१ लाख ८० हजार रुपयांचे शुल्क जमा केले.
औरंगाबाद : शहरामध्ये परवान्याकडे पाठ फिरवीत केवळ इरादापत्रावर रिक्षा चालविण्याचा प्रकार चारशेवर रिक्षाचालकांकडून सुरू होता. आरटीओ कार्यालयाने अशा रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारताच अवघ्या काही दिवसांत ३१८ रिक्षाचालकांनी काही दिवसांत ३१ लाख ८० हजार रुपयांचे शुल्क जमा केले.
शहरात काही महिन्यांपूर्वीच नवीन रिक्षा परवाने देण्यास सुरुवात झाली. या नवीन रिक्षांसाठी आरटीओ कार्यालयाने इरादापत्र दिल्यानंतर वितरकाकडून रिक्षा मिळते, त्यावर रिक्षाची नोंदणीही केली जाते. रिक्षा घेतल्यानंतर दहा हजार रुपये शुल्क भरून पक्का परवाना घेणे आवश्यक आहे; परंतु शहरामध्ये चारशे रिक्षाचालकांनी इरादापत्र घेतल्यानंतर आरटीओ कार्यालयाकडे पाठ फिरवली. या रिक्षांच्या विरोधात कारवाई सुरू करताच पहिल्याच दिवशी पंधरा रिक्षा जप्त करण्यात आल्या. अखेर कारवाई टाळण्यासाठी रिक्षाचालकांनी परवाना शुल्क भरण्यासाठी आरटीओ कार्यालयात धाव घेतली.
आरटीओकडून रिक्षा जप्त करण्याची कारवाई होत असल्याने अवघ्या काही दिवसातच ३१८ रिक्षाचालकांनी प्रत्येकी १० हजार याप्रमाणे ३१ लाख ८० हजार रुपयांचे शुल्क जमा केले, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी दिली.