पिकअपमध्ये वर कुलर आत ४ लाखाची व्हिस्की; मद्य तस्करीच्या मास्टरमाइंडसह दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 07:59 PM2021-03-04T19:59:13+5:302021-03-04T20:02:21+5:30
crime news गेवराई ( बीड ) येथून व्हिस्की दारूची वाहतूक पैठण तालुक्यात होणार असल्याची खबर उत्पादन शुल्क निरीक्षक शरद फटांगडे यांना मिळाली होती.
पैठण : गोवा राज्यात विक्रीचा परवाना असलेल्या दारूच्या (व्हिस्की) ४ लाख रूपयाच्या ११५२ बाटल्यासह दोन मद्य तस्करांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली आहे. पैठण औरंगाबाद रोडवर कौडगाव बीडकीन दरम्यान बुधवारी ही कारवाई करण्यात आली. मद्य तस्करीचा प्रमुख सुत्रधार असलेला गेवराईचा रामेश्वर हातोटे यास या प्रकरणात गेवराई येथून ताब्यात घेतल्याचे उत्पादन शुल्क निरीक्षक शरद फटांगडे यांनी सांगितले.
गेवराई ( बीड ) येथून व्हिस्की दारूची वाहतूक पैठण तालुक्यात होणार असल्याची खबर उत्पादन शुल्क निरीक्षक शरद फटांगडे यांना मिळाली होती. यानुसार सुधाकर कदम अधीक्षक , राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शरद फटांगडे, दुय्यम निरीक्षक आगळे व रोटे , जवान विजय मकरंद , अमोल अन्नदाते , राजु अंभोरे , हर्षल बारी व नवनाथ घुगे यांनी पैठण ते बीडकीन दरम्यान ठिकठिकाणी सापळे लावले होते. मध्यरात्रीच्या सुमारास धम्मा भिमा वक्ते व गणेश अच्युतराव लहाने ( रा. पाचेगाव ता गेवराई , जि . बीड ) हे दोघे पिकअप जीपने (एम.एच १७ के ९७६२) परराज्यात विक्री करिता असलेला विदेशी मद्यसाठा बेकायदेशिरपणे बाळगून बिडकीनच्या दिशेने सुसाट निघाले होते. जीप बिडकिनच्या दिशेने येत असल्याने बीडकीन परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ सदर जीपला अडथळा करून निरीक्षक शरद फटांगडे यांनी थांबवून जीप मधील दोघांना ताब्यात घेतले.
जीपमध्ये गोवा राज्यात विक्रीचा परवाना असलेला तसेच गोवा राज्यात महसूल जमा केलेला हिस्की दारूच्या ( १८० मि.ली. क्षमता ) विविध बॅच क्रमांकाच्या ११५२ सिलबंद बाटल्या मिळून आल्या. सदर मद्य तस्करीचा सुत्रधार गेवराई येथील रामेश्वर बळीराम हातोटे असल्याचे समोर येताच विभागीय उपायुक्त प्रदिप पवार यांनी बीड विभागाला सूचना देऊन रामेश्वर हातोटे यास अटक करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर पाचेगाव ( ता. गेवराई ) येथून रामेश्वर हातोटे यास अटक करण्यात आली. या प्रकरणी रामेश्र्वर हातोटेसह जीप मधील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
वरून कुलर आतून दारू
मद्य तस्करी करण्यासाठी जिपमध्ये १ फुट उंचीचा लोखंडी पत्रा टाकून कप्पा तयार करण्यात आल्याचे दिसून आले या कप्प्यावर जुने कुलर व लोखंडी रॅक ठेवण्यात आले होते. प्रथम दर्शनी जीप मधून कुलर व रॅकची वाहतूक होत असल्याचे दिसून आले मात्र त्याखालील कप्प्यात दारूच्या बाटल्या लपविण्यात आलेल्या होत्या.