४८ रेमडेसिविरची हेराफेरी : अटकेतील अधिकाऱ्यांचे परस्परांकडे बोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:06 AM2021-05-05T04:06:48+5:302021-05-05T04:06:48+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या औषधी भंडारातून ४८ रेमडेसिविर इंजेक्शनच्या झालेल्या चोरी गुन्ह्यात अटकेतील मनपाचे दोन्ही अधिकारी परस्परांकडे बोट दाखवित ...
औरंगाबाद : महापालिकेच्या औषधी भंडारातून ४८ रेमडेसिविर इंजेक्शनच्या झालेल्या चोरी गुन्ह्यात अटकेतील मनपाचे दोन्ही अधिकारी परस्परांकडे बोट दाखवित असल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. न्यायालयाने मंगळवारी दोन्ही आरोपीना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मुख्य औषध निर्माण अधिकारी विष्णू दगडू रगडे (रा. मारुतीनगर, मयूरपार्क) आणि कंत्राटी औषध निर्माण अधिकारी प्रणाली शेषराव कोल्हे (रा. मयूरपार्क) यांना सोमवारी रात्रीच पोलिसांनी अटक केली. प्रणालीने पोलिसांना सांगितले की, औषधीगृहाच्या कुलपाच्या दोन किल्ल्या आहेत. यापैकी एक किल्ली तिच्याकडे तर दुसरी रगडेकडे होती. ४८ रेमडेसिविर इंजेक्शन कमी असल्याचे समोर आल्यावर ही बाब तेव्हाच रगडेला सांगितली. मात्र त्यांनी ही बाब लपवून ठेवली असे तिचे म्हणणे आहे. तिने ही बाब अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना का सांगितली नाही, याचे उत्तर मात्र तिने दिले नाही, तर रगडे याने चौकशीदरम्यान रेमडेसिविर इंजेक्शन सांभाळण्याची जबाबदारी स्वतःची असल्याचे मान्य केले. मात्र औषधी भंडारची एक किल्ली प्रणालीकडे असल्यामुळे तिचीही जबाबदारी असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. इंजेक्शन कशी गहाळ झाली हे मात्र समजले नाही. मेल्ट्रॉनला पाठविलेल्या रेमडेसिविरच्या बॉक्समध्ये दुसरी इंजेक्शन कोणी ठेवले यांसह अन्य प्रश्नांची उत्तरे देण्याचे दोन्ही आरोपींनी टाळल्याचे सूत्राने सांगितले.
=====================
चौकट
कुणाला दिले इंजेक्शन?
तपास अधिकारी सहायक निरीक्षक साईनाथ गिते यांनी मंगळवारी आरोपी रगडे आणि कोल्हेला न्यायालयात हजर केले. सरकारी नोकर असल्यामुळे त्यांनी केलेला गंभीर गुन्ह्याचा तपास प्राथमिक स्तरावर आहे.
त्यांनी अपहार केलेली इंजेक्शन कुणाला दिले? यात त्यांचे आणखी साथीदार कोण आहेत याबाबत तपास करायचा असल्यामुळे त्यांची सात दिवस कोठडी मागितली. न्यायालयाने आरोपींना सात दिवस पोलीस कोठडी मंजूर केली.