औरंगाबाद : शहरातील १२ नागरिकांनी चिटफंडासह दामदुपटीच्या आमिषांना बळी पडून विविध माध्यमांतून पैसे पाठविले होते. त्यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधितांनी सायबर पोलिसांकडे ( Cyber Crime ) धाव घेतली. तक्रारदारांनी फोन पे, गुगल पेसह इतर ऑनलाइन गेट वेच्या माध्यमातून पेमेंट केले होते. त्या गेट वेच्या प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून फसवणूक झालेल्या १२ नागरिकांचे ५ लाख ६४ हजार रुपये परत मिळवून दिले आहेत.
सायबर पोलीस ठाण्यात १२ नागरिकांनी ऑनलाइन फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. निरीक्षक गौतम पातारे यांनी तक्रारींची तत्काळ दखल घेत तांत्रिक बाजू तपासली. ज्या गेट वेच्या माध्यमातून पेमेंट झाले होते, त्या व्यवस्थापनाला माहिती कळवून नागरिकांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आणून दिले. यासाठी उपनिरीक्षक राहुल चव्हाण, हवालदार सुशांत शेळके आणि रवींद्र पौळ यांनी अधिक तपास करीत ज्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले होते ती खाती गोठविण्याची मागणी केली. गुगल पे, फोन पेसह इतर कंपन्यांनी अधिक तपास केला असता, संबंधितांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधित तक्रारदारांनी पाठविलेले ५ लाख ६४ हजार रुपये पुन्हा त्यांना रिफंड केल्याची माहिती निरीक्षक गौतम पातारे यांनी केली. ही कामगिरी आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते, सहायक पोलीस निरीक्षक विशाल ढुमे, यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पातारे, उपनिरीक्षक चव्हाण, हवालदार सुशांत शेळके, रवींद्र पौळ यांनी केली.
आमिषाला बळी पडू नकानागरिकांनी पैसे दुप्पट करून देतो, क्रेडिट कार्डचे पॉइंट्स वाढविण्याच्या योजनांसह संदेश आपल्या मोबाइलवर सतत येत असतात. या संदेशाच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्यात येते. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपली कोणतीही गोपनीय माहिती संबंधितांना शेअर करू नये, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे यांनी केले आहे.