५ हजार स्वयंसेवक, दीड लाख कुटुंबाना वाटणार श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अक्षता
By प्रशांत तेलवाडकर | Published: December 26, 2023 04:23 PM2023-12-26T16:23:37+5:302023-12-26T16:24:25+5:30
जय श्रीरामाच्या जयघोषात २६ अक्षता कलशांचे आज वितरण
छत्रपती संभाजीनगर : ५ हजार स्वयंसेवक, १ ते १५ जानेवारी या काळात शहरातील दीड लाख कुटुंबांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यांना अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पत्रिका व अक्षता देणार आहेत. यासाठी शहरातील २६ भाग तयार करण्यात आले असून, तेथील २६ पदाधिकाऱ्यांकडे सोमवारी अक्षता कलश सुपूर्द करण्यात आले.
समर्थनगरातील वरद गणेश मंदिरात सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अयोध्येहून आलेला एक मोठा अक्षता मंगल कलश व त्यासोबत २६ लहान कलश मंदिरात आणण्यात आले. तेव्हा उपस्थित स्वयंसेवकांनी ‘एकही नारा, एकही नाम, जय श्रीराम’ चा जयघोष केला. या सोहळ्याचे साक्षीदार महानुभाव पंथाचे सुदर्शन कपाटे महाराज, चिन्मय मिशनचे आत्मेशानंद महाराज, भाई खडकसिंग ग्रंथी, प्रभाकर हरळ महाराज, विहिंपचे प्रांताध्यक्ष संजय बारगजे, जिल्हाध्यक्ष डॉ. जीवनसिंग राजपूत, वाळूजचे जिल्हा संघचालक अनिल पाटील, राजीव जहागीरदार हे होते. सर्वप्रथम श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा अक्षता मंगल कलशाचे पूजन जगदीश हर्सूलकर दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक भागातील स्वयंसेवकांना बोलावून त्यांच्याकडे वितरणासाठी अक्षता कलश सुपूर्द करण्यात आले.
सोहळा यशस्वीतेसाठी अभिषेक कादी, पंकज पाडळकर, सीताराम कीर्तीकर, रुपेश बंगाळे, नीलेश कुलकर्णी, सुनील खोचे, साईनाथ तारे, ऋषिकेश कुलकर्णी, सुभाष कुमावत, मिलिंद जाधव आदींनी परिश्रम घेतले.