सन्मान योजनेचे ५१ लाख वसूल
By | Published: December 8, 2020 04:00 AM2020-12-08T04:00:23+5:302020-12-08T04:00:23+5:30
सिल्लोड : तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत साडेआठशे सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच कर भरणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांना योजनेत ७८ लाख ...
सिल्लोड : तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत साडेआठशे सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच कर भरणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांना योजनेत ७८ लाख ८२ हजारांचा निधी वाटप करण्यात आला होता. संबंधित शेतकरी अपात्र असल्याचे समोर आल्यानंतर महसूल विभागाने नोटीसा बजावल्यानंतर यातील ५४६ जणांनी तहसील कार्यालयाने आतापर्यंत ५१ लाख ८४ हजार रुपये जमा केले आहे. आम्ही इन्कम टॅक्स भरत नाही, केवळ रिटर्न दाखल केले आहे. आमचे उत्पन्न पाच लाखाच्या आत असल्याने आम्ही या योजनेस पात्र असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना पेन्शन म्हणून हा निधी वाटप करण्यात आला होता. त्यात सरकारी नोकरदार, कर भरणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पण काही शेतकऱ्यांनी हमी पत्र भरून दिल्याने नजर चुकीने शासनाकडून सिल्लोड तालुक्यातील ८५० अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ७८ लाख ८२ हजाराचा निधी जमा झाला होता. संबंधितांना महसूल कार्यालयाने नोटीस बजावत आठ दिवसात लाभाचा रक्कम कार्यालयात जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आतापर्यंत ५४६ जणांनी ५१ लाख ८४ हजाराची रक्कम जमा केली आहे.
----- जिल्ह्यात सव्वासात हजार शेतकरी अपात्र ----
औरंगाबाद जिल्ह्यात अपात्र शेतकऱ्यांची संख्या ७ हजार २३८ असून त्यांच्या बँक खात्यावर एकूण ६ कोटी ८४ लाख १४ हजाराचा शेतकरी सन्मान निधी काही दिवसापूर्वी जमा करण्यात आला आहे. त्यापैकी जिल्ह्यात एक ३७३ शेतकऱ्यांनी एक कोटी ३० लाख ५४ हजार रुपये शासनाच्या खात्यावर जमा केले असल्याचे पुढे आले आहे.
----- तालुकानिहाय वसूल करण्यात आलेला निधी -----
औरंगाबाद १९७ शेतकऱ्यांकडून १८ लाख ८६ हजार, गंगापूर २७ शेतकरी २ लाख ६४ हजार, कन्नड ४८ शेतकरी ४ लाख ८४ हजार, खुलताबाद १६४ शेतकरी १५ लाख ९६ हजार, पैठण १४ शेतकरी एक लाख ३८ हजार, फुलंब्री १५ शेतकरी एक लाख ५० हजार, सिल्लोड ५४६ शेतकरी ५१ लाख ८४ हजार, सोयगाव २१५ शेतकरी २ लाख २ हजार, वैजापूर १४६ शेतकरी १३ लाख ७० हजार, अशा एकूण एक हजार ३७३ शेतकऱ्यांकडून एकूण एक कोटी ३० लाख ५४ हजाराची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
------- शेतकऱ्यांविरुद्ध होणार गुन्हे दाखल -----
जिल्ह्यात अजूनही ५ हजार ८६५ शेतकऱ्यांकडे ५ कोटी ५३ लाख ६० हजाराची बाकी आहे. सिल्लोड तालुक्यात जवळपास ६५ टक्के वसुली झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अपात्र असताना निधीचा लाभ घेतला अशा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर बोजा टाकून किंवा त्या त्या पोलीस ठाण्यात जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाने गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. यामुळे तत्काळ अपात्र शेतकऱ्यांनी पैसे भरावे.
- विक्रम राजपूत, तहसीलदार सिल्लोड.