उमरगा : ‘बेलगाम वाहतुकीमुळे उमरग्यात वाढले अपघात’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध करताच पोलीस प्रशासनाने अवैधरित्या वाहतूक करणारी २८ वाहने व सहा हातगाड्यांविरूद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला.उमरगा शहरातून जाणाऱ्या महामार्गावर रिक्षा टमटम, दुचाकी बेशिस्तपणे उभी केली जातात. एवढेच नाही तर जड वाहनेही रस्त्यावर कुठेही उभी करण्यात येतात. त्यामुळे हे थोडके म्हणून की काय, फळे, भाजी, कपडे विक्रेतेही हातगाडे महामार्गवर उभे करतात. दुचाकींचीही बेशिस्तपणे पार्किंग केली जात आहे. त्यामुळे उमरगेकर प्रचंड त्रस्त झाले झाले आहेत. दरम्यान, धूम स्टाईलने दुचाकी चालविणाऱ्यांविरूद्ध कुठल्याही स्वरूपाची कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल उंचावले आहे. त्यामुळे विशेषत: पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. दरम्यान, हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने ‘बेलगात वाहतुकीमुळे उमरग्यात वाढले अपघात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. शुक्रवारी सकाळपासून बेशिस्त वाहनधारक तसेच गाडेधारकांविरूद्ध कारवाई करण्यास सुरूवात केली. या मोहिमेदरम्यान एक -दोन नव्हे, तर तब्बल २८ वाहनधारकांविरूद्ध मोटार अधिनियम कलम १२२/१७७ अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे रहदारीस अडथळा ठरणाऱ्या सहा हातगाडेधारकांवर मुंबई अधिनियम कलम १०२/११७ कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आले. सदरील कारवाईमुळे मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला. सदरील कारवाईबाबात नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले. (वार्ताहर) कंत्राटदारांच्या हिताची काळजी?पालिकेच्या कंत्राटदाराकडून अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांकडूनही कर घेतला जातो. त्यामुळेच पालिका प्रशासनाकडून अशा व्यवसायिकांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला जात नाही, असा आरोप नागरिकांतून होत आहे. पालिकेला नागरिकांच्या हितापेक्षा कंत्राटदाराच्या हिताचीच अधिक काळजी असल्याचा आरोपही होत आहे.बेलगाम वाहनधारकांमुळे नागरीक प्रचंड त्रस्त आहेत. शुक्रवारी पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई केल्यातुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला खरा. परंतु, दोन-तीन दिवसानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने सदरील कारवाईत सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
६ हातगाडे,२८ वाहनांवर उगारला कारवाईचा बडगा !
By admin | Published: July 16, 2016 12:59 AM