औरंगाबाद : फक्त ३१ टक्के मतदारांनी निवडून दिलेले हे मोदी सरकार आहे. ३१ आकडा मोठा आहे की उर्वरित ६९? मग आता ६९ टक्के मतदारांनी एक होऊन देश आणि संविधान वाचवण्याची गरज आहे. देशातील तमाम संविधानवादी व धर्मनिरपेक्षवादी संस्था-संघटना व पक्षांनी एक व्हावे व देश तोडणारी भाजपा, आरएसएस यांचा दारुण पराभव करावा, असे कळकळीचे आवाहन रविवारी येथे देशाचे युवा नेते कॉ. कन्हैयाकुमार यांनी केले. आपल्या खास बिहारी शैलीत तब्बल पाऊणतास मोदींच्या मर्मावर बोट ठेवणारे भाषण करीत कन्हैयाकुमार यांनी ही सभा जिंकली.
सध्या देशात सुरू असलेला जातीयवाद आणि कॉर्पोरेट लूट थांबलीच पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. आमखास मैदानावर ‘देश बचाव... संविधान बचाव’ अभियानांतर्गत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण आणि विविध धर्मनिरपेक्ष व संविधानवादी संस्था-संघटनांनी ही जाहीर सभा आयोजित केली होती. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद या सभेला मिळाला. पाच हजार खुर्च्या भरून लोकांनी कन्हैयाकुमार यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यात युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. ‘तुमचं आमचं नातं काय... जय शिवराय, जय भीमराय’ ही घोषणा त्यांनी उपस्थितांकडून वदवून घेत व डफावर ‘आझादी’चे क्रांतिगीत म्हणत या सभेचा समारोप कन्हैयाकुमार यांनी केला. सभेचे संयोजक आ. सतीश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. आमदार बाबाजानी दुर्राणी, कॉ. तुकाराम भस्मे, प्रा. सुनील मगरे, प्रा. उमाकांत राठोड, अमोल दांडगे, शेख जहूर, इलियास किरमाणी आदींची भाषणे झाली. यावेळी एमआयएमवर किरमाणी यांनी सडकून टीका केली. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. संविधानाची प्रत देऊन चव्हाण यांनी कन्हैयाकुमार यांचे स्वागत केले. कॉ. राम बाहेती, कॉ. अभय टाकसाळ, कॉ. अश्फाक सलामी आदींसह मंचावर इतर नेते उपस्थित होते.आता सत्तेसाठी रामाचा वापर...आता मोदींच्या नावाने सत्ता येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर रामनामाचा जप सुरू आहे. यांना मंदिर बांधायला रोखले कुणी? यांना मंदिर बनवायचेच नाही. त्या मुद्यावर हे दोनदा सत्तेत आले. आता पुन्हा राम मंदिराच्या मुद्यावरच सत्ता हस्तगत करायची आहे. १९९२ साली बाबरी पाडली. आता २०१८ चालू आहे. हा आस्थेचा प्रश्न जरूर आहे; पण मशीद पाडण्यापूर्वीही आस्था होतीच. या सरकारची विचारधाराच मनुस्मृतीवर आधारित असल्यामुळे आज कोणीही समाधानी नाही, असे कन्हैयाकुमार यांनी यावेळी नमूद केले.