औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात निकालात अधिक पारदर्शकता, गतिमानता आणण्यासाठी कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी ऑनलाइन मूल्यांकनाचा पायलट प्रोजेक्ट ‘ट्रायल ॲण्ड एरर बेस’ वर सुरू केला. पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाइन सुरू होऊन महिना सरला. परीक्षा संपल्याने निकालाचे काउंट डाउन सुरू झाले. एक लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग पूर्ण झाले. मात्र, १० ते १५ टक्केच उत्तरपत्रिकांचे प्राध्यापकांनी ऑनलाइन मूल्यांकन केले. १२ ठिकाणी दीडशे संगणकावर सुसज्ज व्यवस्था निर्माण केली असताना उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने परीक्षा विभागही हतबल झाला आहे.
पदव्युत्तर पदवी व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या १७ जानेवारी रोजी पदव्युत्तर परीक्षा सुरू होताच १८ जानेवारी रोजी राजर्षी शाहू महाराज परीक्षा भवनात 'डिजिटल व्हॅल्यूएशन सेंटर’ सुरू करण्यात आले. या केंद्रात १५ संगणकांवर ३ हजार उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग रोज होत आहे. पदव्युत्तर व व्यावसायिक १०५ कोर्सच्या १ लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग पूर्ण झाले. २५ हजार उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग अजून झालेले नाही. स्कॅनिंग गतीने होत असल्याने विद्यापीठ परिसरातील १२ ठिकाणी ऑनलाइन मूल्यांकनासाठी दीडशे संगणकांवर साॅफ्टवेअर इन्स्टाॅल करण्यात आले. मात्र, मूल्यांकनासाठी आवश्यक प्राध्यापक दररोज उपलब्ध होत नसल्याची सद्य:स्थिती असल्याने वेळेत निकालाचे उद्दिष्ट अवघड बनत चालले आहे. पुढील आठ दिवसांत विद्यापीठ परिसरातील विभागांचे निकाल लागण्यास सुरुवात होऊ शकते. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमांचा निकाल प्राध्यापकांच्या मूल्यांकनावर अवलंबून असल्याचे परीक्षा विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
विज्ञान शाखेच्या सर्वाधिक उत्तरपत्रिकापरीक्षा मंडळ संचालक डॉ. गणेश मंझा, उपकुलसचिव डॉ. प्रताप कलावंत, युनिकचे संचालक डॉ. प्रदीप यन्नावार, केंद्रप्रमुख डॉ.ओमप्रकाश जाधव आदी १२ तासांपेक्षा अधिक वेळ मेहनत करत आहेत. मात्र, मूल्यांकनासाठी प्राध्यापकांचे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्केच उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. कला शाखेपेक्षा विज्ञान शाखेच्या उत्तरपत्रिका सर्वाधिक आहेत. विज्ञान शाखेसह फार्मसीच्या प्राध्यापकांकडून तुलनेत मूल्यांकनाला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे निरीक्षण आहे. मूल्यांकन केंद्राकडून वारंवार फोन करून प्राध्यापकांना बोलावण्यात येत असून नॅकची तयारी, परीक्षा, आजारपणाची कारणे देत टाळाटाळ करत असल्याने परीक्षा विभागातील अधिकारी वैतागले आहेत.