शहरातील ९४ टक्के शालेय विद्यार्थी समाज माध्यमांवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 06:46 PM2020-01-06T18:46:20+5:302020-01-06T18:49:10+5:30

बालरोगतज्ज्ञ संघटनेचे सर्वेक्षण 

94 % of school students in the city are on social media | शहरातील ९४ टक्के शालेय विद्यार्थी समाज माध्यमांवरच

शहरातील ९४ टक्के शालेय विद्यार्थी समाज माध्यमांवरच

googlenewsNext
ठळक मुद्दे दिवसभरात मुलांचा किमान १ ते २ तास मोबाईलचा वापर आरोग्यासह अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : औरंगाबाद बालरोगतज्ज्ञ संघटनेतर्फे नुकतेच मोबाईल वापराविषयी इयत्ता ८ ते १० वीतील ४०० मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून ९४ टक्के विद्यार्थी सोशल मीडियावर असल्याचे समोर आले. दररोज कमीत कमी १ ते २ तास मुले मोबाईलवर व्यस्त असतात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा अतिवापर होत असल्याने बालरोगतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली.

आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. संवादासह अनेक गोष्टींसाठी स्मार्ट फोन महत्त्वपूर्ण ठरत आहे; परंतु त्याच वेळी स्मार्ट फोन आणि मोबाईलच्या व्यसनात शालेय विद्यार्थी अडकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाचा लहान मुले अतिवापर करीत आहेत. औरंगाबाद बालरोगतज्ज्ञ संघटनेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे ही समस्या रोखण्यासाठी व त्याच्या दुष्परिणामाची जाणीव करून देण्यासाठी संघटनेच्या नव्या कार्यकारिणीकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 

बालरोगतज्ज्ञ संघटनेने शहरातील ८ ते १० वीतील ४०० मुलांना काही प्रश्नावलीच्या माध्यमातून मोबाईलच्या वापराविषयी विचारणा केली होती. त्यातून अनेक मुद्दे समोर आले आहेत. सर्वेक्षण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९४ टक्के मुले सोशल मीडियावर कार्यरत असल्याचे समोर आले. त्यासाठी अनेकांकडे स्वत:चा मोबाईल आहे, तर काहींनी पालकांचा मोबाईल वापरत असल्याचे नमूद केले. अनोळखी लोकांशी मैत्री केली जाते. दिवसभरात मनोरंजनााठी कमीत कमी १ ते २ तास मोबाईलचा वापर करीत असल्याचे मुलांनी नमूद केले. ८८ टक्के मुलांना सायबर क्राईम, दुष्परिणामांविषयी कल्पना नाही. मनोरंजनासाठी मोबाईलचा वापर वाढत आहे. त्यामुळे अनेक शाळांनी मोबाईल आणण्यावर बंदी घातल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

डिप्रेशन, लवकर चष्मा, बहिरेपणा
मोबाईलवर गेम खेळताना एक लेव्हल पार झाल्यानंतर दुसरी लेव्हल पार करण्याची सवय लागते. त्यासाठी तासन्तास वेळ दिला जातो. त्यातून मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. मोबाईल काढून घेतल्यास मुले चिडचिड करतात. अनेक मुले तर डिप्रेशनमध्ये जातात. मोबाईलवर हेडफोन लावून गाणी ऐकली जातात. त्यातून ऐकण्याच्या क्षमतेवर परिमाण होतो, तर लवकर चष्मा लागण्याचे प्रकारही वाढत आहेत. वाचनाचे प्रमाण कमी होत आहे. या सगळ्याचा शाळेतील प्रगतीवरही परिणाम होतो. मुले एकाकी राहू लागतात.

३० टक्के मुलांमध्ये दुष्परिणाम
मुलांचा त्रास होऊ नये, यासाठी आई-वडिलांकडून मुलांना मोबाईल दिला जातो. त्यातून मुलांना मोबाईलच्या अतिवापराची सवय लागते. त्यातून मुलांमध्ये विड्रॉल सिमटन्स दिसतात. मोबाईल दूर केला तर मुले चिडचिड करतात. इतर अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. पालकांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे. मोबाईलचा वापर करणाऱ्या ३० टक्के मुलांमध्ये अनेक दुष्परिणाम दिसतात.
-डॉ. सागर कुलकर्णी, सचिव, औरंगाबाद बालरोगतज्ज्ञ संघटना

मुलांच्या विकासावर परिणाम
इयत्ता ८ ते १० वीतील ४०० मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. मोबाईलचा किती वापर करतात, सोशल मीडियावर आहेत का आदींची विचारणा केली. अनेक विद्यार्थ्यांकडे स्वत:चा मोबाईल आहे, तर अनेक जण पालकांचा मोबाईल वापरतात. त्यातून मुलांच्या शारीरिक वाढीवरही परिणाम होतो. मुलांचे खेळणे थांबते. अभ्यासावरही परिणाम होत असल्याचे दिसून येते. संवादासाठी मुलांना स्मार्ट फोनऐवजी साधा मोबाईल दिला तरी चालतो.
-डॉ. तृप्ती बोरूळकर, बालरोगतज्ज्ञ

Web Title: 94 % of school students in the city are on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.