९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 01:52 PM2021-01-08T13:52:45+5:302021-01-08T13:56:52+5:30
94th Akhil Bharatiy Marathi Sahitya Sanmelan : नाशिक येथील लोकहितवादी मंडळाचा प्रस्ताव संमेलनासाठी स्वीकारला
औरंगाबाद : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला मार्च अखेर होणार असल्याची घोषणा अ. भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. नाशिक येथील लोकहितवादी मंडळाचा प्रस्ताव संमेलनासाठी स्वीकारल्याचे ठाले पाटील यांनी सांगितले.
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळावे, यासाठी अखेरच्या टप्प्या दिल्ली आणि नाशिक अशी चुरस पाहायला मिळाली. मात्र अ. भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिल्लीसाठी नकार असल्याचे संकेत दिल्याने संमेलन नाशिक येथेच होईल हे स्पष्ट झाले होते. साहित्य महामंडळाकडे दिल्ली, पुणे, अंमळनेर आणि नाशिक येथील लोकहितवादी मंडळ आणि अन्य एक अशी निमंत्रणे आली होती. यातच कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीने साहित्य संमेलन घेणार नाही, अशी भूमिका ठाले पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मांडली होती. त्यामुळे साहित्य संमेलन होणार तर कुठे आणि कसे याची चर्चा सध्या साहित्य वर्तुळात रंगली होती. यातच दिल्लीच्या निमंत्रणावरून संजय नहार आणि ठाले पाटील यांच्यात आरोपप्रत्यारोप रंगले होते. मात्र, सर्व तर्कांना पूर्णविराम मिळत ठाले पाटील यांनी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचा प्रस्ताव स्वीकारल्याचे जाहीर केले. हे संमेलन २०२०-२१च्या मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत ठाले पाटील यांनी दिली.
कुसुमाग्रज यांच्या संकल्पनेतून साकारले लोकहितवादी मंडळ
लोकहितवादी मंडळ ही संस्था कविवर्य कुसुमाग्रज यांच्या संकल्पनेतून १९५० साली स्थापन झाली असून नाशिक परिसरात सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य व कला विषयक काम करीत आहे. संस्थेचे विश्वस्त हेमंत टकले, अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, सचिव सुभाष पाटील, कार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी संमेलनासाठी निमंत्रण कार्यवाह दादा गोरे यांच्याकडे दिले होते.