घरात घुसून ८५ वर्षीय वृद्धेचा अत्याचारानंतर खून; २४ वर्षीय तरुणास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 05:41 PM2023-12-20T17:41:15+5:302023-12-20T17:42:15+5:30
ग्रामस्थांनी घरात प्रवेश करताच चोरटे आल्याचा आरोपीने केला होता बनाव
वैजापूर/लोणी खुर्द : दारू पिऊन मध्यरात्री घरात प्रवेश केलेल्या २४ वर्षीय तरूणाने ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिचा साडीने गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे एक ८५ वर्षीय महिला घरात एकटीच राहत होती. सोमवारी रात्री सदरील महिला घरात झोपली असताना पहाटे दोन वाजेच्या सुमारास आरोपी गुलाब आबा बेलदार (वय २४, रा. भोजे चिंचपुरे, ता. पाचोरा, जि. जळगाव) हा दारूच्या नशेत या महिलेच्या घरात शिरला. यावेळी या महिलेने आरडाओरडा केला असता आरोपीने या वृद्धेवर बलात्कार केला. त्यानंतर या महिलेचे डोके भिंतीवर आपटले. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपी गुलाब याच्या डोक्याला जखम झाली. त्यानंतर त्याने साडीने या वृद्धेचा गळा आवळून खून केला.
यावेळी शेजाऱ्यांना आवाज आल्यानंतर त्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी ८५ वर्षीय महिला त्यांना मृतावस्थेत दिसून आली. यावेळी आरोपी गुलाब हा ग्रामस्थ घरात येताच घरात चोर आले होते. त्यांनीही मला मारहाण केली, ते पळून गेले, असे म्हणून लागला. ही माहिती ग्रामस्थांनी शिऊर पोलिसांना दिली. त्यानंतर सपोनि संदीप पाटील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. सहायक पोलिस अधीक्षक महेक स्वामी यांनीही घटनास्थळी भेट दिली.
ग्रामस्थांमधील आरोपीच्या मुसक्या आवळल्या
आरोपी गुलाब बेलदार मूळचा पाचोरे तालुक्यातील रहिवासी आहे. त्याची बहीण लोणी खुर्द येथे वास्तव्यास असल्याने तो दोन दिवसांपूर्वी बहिणीला भेटण्यासाठी आला होता. मयत महिलेचे घर आरोपीच्या बहिणीच्या घरासमोर असल्याने गुलाबने या वृद्धेवर नजर ठेवली होती. मंगळवारी मध्यरात्री दारूच्या नशेत आरोपीने या महिलेच्या घरात प्रवेश करून बलात्कार केला. त्यानंतर त्यांचा खून केला. पोलिस आल्यानंतर तो ग्रामस्थांमध्येच उभा होता. यावेळी ग्रामस्थांच्या जबाबानंतर पोलिसांनी संशयित म्हणून गुलाब बेलदार याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने आपण खून केला नाही. ६ ते ७ चोरट्यांनी मलाच मारहाण केली, असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. या प्रकरणी आरोपी गुलाब बेलदार याच्याविरुद्ध बलात्कार व खुनाचा शिवूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक योगेश पवार पुढील तपास करत आहेत.