मेकॅनिकने २ हजारांसाठी चालकाला संपवले, मृतदेह लपवून त्याच्याच जीपने कुटुंबासह केले पर्यटन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 12:59 PM2022-11-18T12:59:18+5:302022-11-18T13:03:48+5:30

खून केल्यानंतर चालकाची जीप घेऊन कुटुंबीयांसह केले पर्यटन

A mechanic killed a jeep driver for just 2 thousand; Accused 5 days custody | मेकॅनिकने २ हजारांसाठी चालकाला संपवले, मृतदेह लपवून त्याच्याच जीपने कुटुंबासह केले पर्यटन

मेकॅनिकने २ हजारांसाठी चालकाला संपवले, मृतदेह लपवून त्याच्याच जीपने कुटुंबासह केले पर्यटन

googlenewsNext

वाळूज महानगर ( औरंगाबाद) : अवघ्या २ हजार रुपयांसाठी रांजणगावच्या जीपचालकाचा खून करणारा आरोपी मेकॅनिक तौफिक शेख (रा. वाळूज) यास गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यास ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड जप्त केला.

रांजणगाव शेणपुंजी येथील सुधाकर पुंडलिक ससाणे (३५, रा. वाघोडा, ता. मंठा, जि. जालना) याचा त्याच्या ओळखीचा असलेला मेकॅनिक तौफिक शेख (२२, रा. वाळूज) याने २ हजार रुपयांवरून झालेल्या वादानंतर रविवारी (दि. १३) पंढरपुरात खून केला होता. खून केल्यानंतर तौफिकने पंढरपुरात तो काम करीत असलेल्या दुचाकी शोरूमच्या एका खोलीत मृतदेह लपविला व तो जीप घेऊन नातेवाइकांसोबत पयर्टनासाठी गेला होता. रविवारी रात्री परतल्यानंतर मृतदेह जीपमध्ये टाकून ती गरवारे कंपनीसमोरील निर्जनस्थळी उभी केली व तो पसार झाला होता. पोलीस तपासात मंगळवारी रात्री जीपमध्ये ससाणे याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या ८ तासांत आरोपी मेकॅनिक तौफिक शेख याला त्याच्या वाळूजमधील घरी छापा मारून जेरबंद केले होते.

खुनासाठी वापरलेला रॉड जप्त
जीपचालक सुधाकर ससाणे याचा खून करणाऱ्या आरोपी मेकॅनिक तौफिक शेख याला गुरुवारी वाळूज पोलिसांनी न्यायालयात हजर केले. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी होऊन आरोपी तौफिक शेख याला २१ नोव्हेंबरपर्यंत ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पोलिस उपायुक्त उज्ज्वला वनकर, पोलिस निरीक्षक सचिन इंगोले, सहायक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, कॉन्स्टेबल किशोर साबळे यांनी आरोपी तौफिक काम करीत असलेल्या पंढरपूरच्या दुचाकी शोरूमची पाहणी करीत चौकशी केली होती. तेथील खोलीतून आरोपीने चालक ससाणे याच्या डोक्यात मारलेला लोखंडी रॉड जप्त केला आहे.

चालकाकडे २ हजार रुपये बाकी होते 
तौफिक शेख पंढरपूरच्या दुचाकीच्या शोरूममध्ये मेकॅनिक आहे. सुधाकरशी जुनी ओळख असल्याने ते तौसिफकडे जीप वाॅशिंगसाठी येत होते. त्याचे २ हजार रुपये सुधाकरकडे बाकी होते. रविवारी यावरून दोघांत वाद झाला. तौफिकने सुधाकरच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. ते निपचित पडले. सुधाकरला तसेच शोरूमच्या लगत खोलीत टाकून बाहेरून कुलूप लावून तौफिक निघून गेला.

मृताची जीप घेऊन कुटुंबीयांसह पर्यटन
खून केल्यानंतर तौफिक सुधाकरची जीप घेऊन वाळूजला घरी गेला. नंतर कुटुंबीयांसह तौफिक खुलताबाद व म्हैसमाळला गेला. रात्री पुन्हा पंढरपुरात शोरूमवर येऊन त्याने कुलूप उघडले असता सुधाकर मृत झाल्याचे दिसले. मध्यरात्री तौफिकने मृतदेह जीपमध्ये ठेवला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो ठिकठिकाणी जीप घेऊन फिरला. वाळूजच्या गरवारे कंपनीसमोरील निर्जन भागात जीप उभी करून तो घरी निघून गेला.

Web Title: A mechanic killed a jeep driver for just 2 thousand; Accused 5 days custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.