औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्यातील विघ्ने काही केल्या थांबायला तयार नाहीत. कधी जलवाहिनी फुटते तर कधी तांत्रिक अडचण निर्माण होते. सोमवारी मध्यरात्री २ वाजता जायकवाडी पंपगृहातील पंप क्रमांक ४ च्या फिडरमध्ये उंदीरमामा घुसले. शॉर्टसर्किटमुळे त्यांनी ट्रान्सफाॅर्मरच खराब केले. दुरुस्तीसाठी तब्बल १३ तास लागले. त्यामुळे शहरात एक थेंबही पाणी आले नाही. सोमवारी अनेक वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागला. अगोदरच पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागतील.
शहराला १४०० आणि ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा होतो. मागील आठवड्यात ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी बिडकीनजवळील फरशी फाटा येथे फुटली होती. दुरुस्तीसाठी तब्बल ३० तास लागले होते. यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच दोन दिवसांपूर्वी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात पंपात तांत्रिक बिघाड झाला. या दोन घटनांमुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला. सोमवारी रात्री २ वाजता जायकवाडी येथील पंपगृहात जुन्या व नवीन योजनेवरील वीजपुरवठा अचानक खंडित झाला, त्यामुळे पाणी उपसा बंद झाला. नवीन योजनेवरील पंपगृहाच्या मेन पॅनलमध्ये कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता चार नंबरच्या पंपावरील फिडरमध्ये उंदीर घुसल्यामुळे स्पार्किंग झाल्याचे निदर्शनास आले. या स्पार्किंगमुळे फेज टू फेज अर्थ फॉल्ट झाला आणि सबस्टेशनवरील ट्रान्सफॉर्मर खराब झाले.
कर्मचाऱ्यांनी रात्रीच नवीन जायकवाडी पंपगृहातील सप्लाय बायपासद्वारे ७०० मिमी व्यासाच्या योजनेचा पाणीपुरवठा पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी सुरू केला. दुसरी १४०० मिमी व्यासाची योजना सुरू करण्यासाठी दुपारचे दोन वाजले. ११ तास ही योजना बंद होती. त्यामुळे शहरात शहरात पाणी येऊ शकले नाही. शहरात दुपारी ३ वाजेनंतर पाणी येण्यास सुरुवात झाली.
पाणीपुरवठा विस्कळीत राहणारसोमवारी मध्यरात्रीच्या घटनेमुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी काही दिवस लागतील. नागरिकांच्या गैरसोयीबद्दल महापालिका दिलगिरी असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.