हत्यार बनविणाऱ्या कारखान्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:28 AM2018-06-02T00:28:30+5:302018-06-02T00:29:11+5:30
शहरात सलग दोन दिवस कुरिअरच्या पार्सलमधून तलवारी तसेच जंबिया, चॉपर अशी घातक शस्त्रे गुन्हे शाखेने पकडली. शुक्रवारी बिडकीन पोलिसांनी चार ठिकाणी टाकलेल्या धाडसत्रात धारदार तलवारी, कुकरी, चाकू इत्यादी घातक शस्त्रे तयार करण्याच्या साहित्यासह चार जणांना ताब्यात घेतले. चितेगाव, केसापुरी, फारोळा व आलाना तांडा या गावांत गुरुवारी व शुक्रवारी सकाळी बिडकीन पोलिसांनी छापे मारून आरोपींना जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चितेगाव : शहरात सलग दोन दिवस कुरिअरच्या पार्सलमधून तलवारी तसेच जंबिया, चॉपर अशी घातक शस्त्रे गुन्हे शाखेने पकडली. शुक्रवारी बिडकीन पोलिसांनी चार ठिकाणी टाकलेल्या धाडसत्रात धारदार तलवारी, कुकरी, चाकू इत्यादी घातक शस्त्रे तयार करण्याच्या साहित्यासह चार जणांना ताब्यात घेतले. चितेगाव, केसापुरी, फारोळा व आलाना तांडा या गावांत गुरुवारी व शुक्रवारी सकाळी बिडकीन पोलिसांनी छापे मारून आरोपींना जेरबंद केले.
औरंगाबाद शहरात झालेल्या दंगलीनंतर पोलिसांनी शहरात अनेक ठिकाणी तलवारी जप्त केल्या आहेत. त्यानंतर एका आॅनलाईन कंपनीकडून शहरात तलवारी व धारदार शस्त्रे पुरविले जात असल्याचे नुकतेच समोर आले आहे. आता औरंगाबाद ग्रामीण पोलीस सावध झाले असून, ग्रामीण पोलिसांनी शस्त्र बाळगत असलेल्या लोकांवर कारवाई सुरू केली आहे. बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांना खबºयाकडून मिळालेल्या माहितीनुसार चितेगाव, केसापुरी, फारोळा व आलाना तांडा या गावांत काही लोक बेकायदेशीररीत्या आपल्या घरामध्ये तलवारी बाळगत आहेत, अशी माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार बिडकीन पोलिसांनी पाळत ठेवून धाडसत्र सुरू केले असता वरील चार ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत ५ तलवारी, १ कुकरी, ६ चाकू व धारदार शस्त्रे तयार करण्याचे साहित्य, असा एकूण १८ हजार १५० रुपये किमतीच मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
याप्रकरणी बिडकीन पोलिसांनी दत्ता महादू बोचकरी (२८, रा. चितेगाव, ता. पैठण), सतीश श्रीमंत सरोदे (२३, रा. केसापुरी, ता. पैठण), बबन लिंबाजी कुलाल (२३, रा. फारोळा, ता. पैठण), संतोषसिंग करमसिंग टाक (४५, रा. आलाना तांडा, ता.जि. औरंगाबाद) यांच्या घराच्या झडतीत धारदार शस्त्रे मिळून आली. तसेच वरील लोकांनी कुणाला शस्त्रे पुरविली आहेत का याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात शस्त्रे मिळून आल्याने तालुकाभर एकच खळबळ उडाली आहे. पकडलेले आरोपी हे स्वत: शस्त्र बनवीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या लोकांनी अनेकांना शस्त्रे तयार करून विकली असल्याचा संशय पोलिसांना आल्यामुळे त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
कारखान्यात कोयते, चाकू बनवून विक्री
संतोष टाक याच्या आलाना कंपनीजवळ एका बंद हॉटेलमध्ये हा कारखाना सुरू असून, त्याच्याकडून हत्यार बनविण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. त्यांनी किती हत्यारे तयार करून कुणाला विक्री केले, याचा शोध पोलीस घेत आहेत.
पथकाने मारले चार गावांत छापे
तलवारीचे लोण परिसरातील खेड्यांतही पसरू लागले असून, गुन्हेगारी कारवाईत त्यांचा काही सहभाग आहे काय, तलवारी आणल्या कुठून, अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी बिडकीन पोलिसांनी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक उज्ज्वला वनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, उपनिरीक्षक विठ्ठल आईटवार, दीपक देशमुख, राजू चव्हाण, सुनील सुरासे, तुळशीराम गायकवाड, संतोष तोडकर, गणेश गंगावणे, कविता रगडे यांनी केली आहे.