बल्फमास्टर तरुणीचा प्रताप; महापालिकेचे बनावट शिक्के, कागदपत्रांच्या आधारे दिली नियुक्ती पत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 06:51 PM2022-01-10T18:51:27+5:302022-01-10T18:52:43+5:30
मनपा आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय आणि अग्निशमन विभागाचे मुंबईतील संचालक के. आर. हत्याल यांच्या बनावट सह्या, शिक्क्यांचा वापर करीत मुख्य आरोपीने नियुक्तीपत्र दिले होते.
औरंगाबाद : महापालिकेतील अग्निशमन दलात नोकरी मिळवून देण्याची थाप मारून मनपा आयुक्त, अग्निशमन विभागाच्या संचालकांच्या बनावट सहीचे कागदपत्रे तयार करून अनेकांना गंडा घालणारी मास्टरमाइंड महिला आरोपीला सिटी चौक पोलिसांनी अटक केली. या महिलेकडे बनावट कागदपत्रे, शिक्के सापडले असून, तिला न्यायालयात हजर केले असता ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.
सोनाली ज्ञानेश्वर काळे-नामेकर (३४, रा. पानरांजणगाव, ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे. मनपा अग्निशमन दलाचे अधिकारी राजू सुरे यांनी ३ मार्च २०२१ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार सोनाली काळेसह उमेश प्रमोद चव्हाण, निकिता नारायण घोडके, रोहण शिवाजी जाधव, सोपान उत्तम खांडेभराड, नितीन ज्ञानेश्वर महालकर, सचिन ज्ञानेश्वर महालकर, प्रतीक प्रमोदराव चव्हाण, शुभांगी विनोद चव्हाण, विभावरी दत्तात्रय चौबे, विशाल राम तायडे यांच्या विरोधात संगनमत करून बनावट सही, कागदपत्रांच्या आधारे नोकरी दिल्याचा गुन्हा सिटी चौक पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता.
मनपा आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय आणि अग्निशमन विभागाचे मुंबईतील संचालक के. आर. हत्याल यांच्या बनावट सह्या, शिक्क्यांचा वापर करीत मुख्य आरोपीने नियुक्तीपत्र दिले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य आरोपी सोनाली काळे- नामेकर ही फरार होती. तपास अधिकारी वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी, निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक गजानन इंगळे, हवालदार देवा सूर्यवंशी, प्रतिमा ताठे यांच्या पथकाकडून तिचा शोध सुरू होता. सायबर शाखेचे निरीक्षक गौतम पातारे यांच्या मदतीने आरोपी सोनाली हिचे मोबाइल लोकेशन वेळावेळी ट्रेस करण्यात येत होते. मात्र, ती गुंगारा देऊन पळून जात होती. शेवटी तिला टाकळी फाटा, शेंद्रा परिसरात छापा मारून पकडण्यात आल्याचे निरीक्षक गिरी यांनी सांगितले.