एसीबीचा धमाका; शेतकऱ्यांच्या ३५ फायलींसाठी २५ हजार रुपये घेताना ३ अधिकारी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 12:11 PM2023-03-28T12:11:45+5:302023-03-28T12:11:58+5:30
कृषी विभागात खळबळ; खुलताबादेत एसीबीची धमाकेदार कारवाई
छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनच्या ३५ फायलींसाठी प्रत्येकी ७०० रुपयांप्रमाणे २४ हजार ५०० रुपये लाच घेणाऱ्या तीन कृषी अधिकाऱ्यांसह कंत्राटी ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई खुलताबाद तहसील कार्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये करण्यात आल्याची माहिती एसीबीचे पोलिस उपाधीक्षक दिलीप साबळे यांनी दिली. याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपींमध्ये खुलताबादचा तालुका कृषी अधिकारी शिरीष रामकृष्ण घनबहादूर, मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब संपतराव निकम आणि कंत्राटी ऑपरेटर सागर नलावडे यांचा समावेश आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ठिबक सिंचन साहित्याच्या डीलरने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत खुलताबाद विभागातील ३५ शेतकऱ्यांना कृषी ठिबक सिंचन साहित्य पुरविल्याबाबतच्या संचिका विजयकुमार नरवडे याच्यामार्फत सादर न करता परस्पर तपासून घेतल्या होत्या. त्यामुळे स्टॉक रजिस्टर चेक करण्यासाठी व डीलरच्या विरोधात आलेला माहिती अधिकार अर्ज फाईल करण्यासाठी अनुदान प्राप्त ३५ फायलींसाठी प्रत्येकी ७०० रुपयांप्रमाणे २४ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे डीलरने एसीबीकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार कृषी अधिकारी नरवडेच्या सांगण्याप्रमाणे ऑपरेटर सागर नलवडेने लाचेची रक्कम स्वीकारली. बाळासाहेब निकम याने मूळ लाचेच्या मागणीशिवाय स्टॉक रजिस्टर तपासण्यासाठी १ हजार रुपये लाच स्वीकारली आणि शिरीष घनबहादूर याने नरवडे यास लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही कारवाई अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक दिलीप साबळे, पोलिस हवालदार भीमराज जिवडे, पाठक, शिंदे, बागूल यांच्या पथकाने केली.
एकाच सापळ्यात तीन अधिकारी
एकाच प्रकरणाच्या सापळ्यात तीन क्लास टू असलेले घनबहादूर, नरवडे आणि निकम हे अधिकारी अडकले आहेत. त्यामुळे कृषी विभागात खळबळ उडाली असून, अनेकांचे धाबे दणाणले आहे.