औरंगाबाद : अपघाताना आळा घालण्यासाठी बीड बायपासवरील जड वाहतूक सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत बंद करण्याचा पोलीस आयुक्तांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. जड वाहनांमुळे बायपासवर होणारे अपघात अडीच महिन्याच्या कालावधीत घटल्याचे समोर आले.
दहा ते पंधरा वर्षांपासून सकाळी ६ ते रात्री १२ या कालावधीत जालना रस्त्यावर जड वाहनांना प्रवेशबंदी आहे. तेव्हापासून जालना रस्त्यावरील जड वाहनांना बीड बायपास हा पर्यायी मार्ग देण्यात आला. त्यामुळे जालना रस्त्यावरील अपघातावर नियंत्रण आले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून बीड बायपासच्या पलीकडे नागरी वसाहतींची संख्या वाढत आहे. तेव्हापासून बायपासवरील अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच आहे.
बायपासवरील अपघातांची मालिका रोखण्यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी २ सप्टेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर या रस्त्यावर जड वाहनांना सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या कालावधीत प्रवेशबंदी केली. हा निर्णय घेण्यापूर्वी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत बायपासवर विविध अपघातात १२ जणांचे बळी गेले होते.
शिवाय ८ जण गंभीर आणि ५ जण किरकोळ जखमी झाले होते. तर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या वर्षभराच्या कालावधीत ९ जणांचे बळी गेले. १३ जण गंभीर आणि ३ जण किरकोळ जखमी झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बायपासवरील अपघातांमधील मृत्यू आणि गंभीर जखमींची संख्या वाढली होती. यामुळे पोलीस आयुक्तांनी बीड बायपासवरील अवजड वाहतूक बंद करण्याचा प्रयोग यशस्वी होत असल्याचे दिसत आहे.
पर्यायी रस्ता हवा गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बायपासवरील अपघातांमधील बळींची संख्या वाढल्याचे दिसून येते. या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी सप्टेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर जड वाहनांना सकाळ, सायंकाळ प्रवेशबंदी केली. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने बायपासवरील जड वाहनांसाठी दुसरा पर्यायी रस्ता तातडीने होणे आवश्यक आहे.- एच. एस. भापकर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा
आकडेवारीवर दृष्टिक्षेप गतवर्षी यावर्षीअपघातांतील बळींची संख्या ९ १२गंभीर जखमी १३ ०८किरकोळ जखमी ०३ ०५